Breaking News

महिला दिनी स्त्रीशक्तीला सलाम; ठिकठिकाणी कार्यक्रम, महिलांचा सन्मान

पनवेल ः प्रतिनिधी

जागतिक महिला दिन मंगळवारी (दि. 8) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध आस्थापना, संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या महिलांना या वेळी सन्मानित केले गेले. एरवी कामात सतत व्यस्त असलेल्या महिलांंसाठी मंगळवारचा दिवस वेगळा होता. जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा सन्मान करणार्‍या संदेशांचा, शुभेच्छांचा सकाळपासून सोशल मीडियात वर्षाव सुरू होता. त्यामुळे महिलावर्ग भारावून गेल्याचे पहावयास मिळाले.

पनवेल महापालिकेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम

महिला दिनाच्या निमित्ताने पनवेल महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. महापालिका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असल्याने या सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम विविधतेत एकता अशी ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  पनवेल महापालिका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असल्याने या सांस्कृतिक कार्यक्रमाची विविधतेत एकता अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध लोकपरंपरा, वासुदेव, मंगळागौर, गोंधळ, लावणी, पोवाडा, कोळीगीत, कविता वाचन, सामुदायिक गायन, वेशभूषेच्या माध्यमातून भारताची विविधता दाखवणारे फॅशन शो तसेच भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या महान स्त्रियांनी योगदान दिले अशा प्रतिकात्मक महिलांचा फॅशन शो असे विविध कार्यक्रम झाले. कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आली. या वेळी सिनेअभिनेत्री सविता मालपेकर उपस्थित होत्या. या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांचे आभार महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय यांनी मानले.सलग दोन वर्षे कोविड काळात सुटी न घेता महिला कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडा विरंगुळा मिळाला.

पनवेलमधील पहिल्या महिला वैमानिकाचा गौरव

जागतिक महिला दिनी कुंडेवहाळ ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे पनवेल तालुक्यातील पहिली महिला वैमानिक प्राप्ती भरत ठाकूर हिचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे नेत्र तपासणी, आदिवासी बांधवांना चष्मे वाटप व आरोग्य तपासणी असे उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास सत्कारमूर्ती महिला वैमानिक प्राप्ती ठाकूर, पंचायत समिती सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, उपमहापौर सीताताई पाटील, गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना शिंदे, माजी नगरसेविका निता माळी, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, नेरे सरपंच राजश्री म्हसकर, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील यांच्यासह प्राप्ती ठाकूर हिचे वडील भरत ठाकूर, आई रजनी ठाकूर व भाऊ प्रतिक ठाकूर उपस्थित होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना शिंदे यांनी महिलांना त्यांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply