कर्जत : बातमीदार
चौक गावातील स्वरांजली आणि स्वराली कदम या लहान मुलींच्या शरिरातील अवयव बदलण्याची गरज डॉक्टरांनी सांगितली आहे. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कर्जत येथील मदर आय फाउंडेशनने एका नाट्य प्रयोगाच्या खेळातून एक लाख 11 हजाराची आर्थिक मदत केली. खालापूर तालुक्यातील चौक येथील अमित जाधव यांच्या दोन लहान मुली स्वरांजली आणि स्वराली यांना असलेल्या आजारामुळे त्यांच्यावर अवयव बदलाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. बोन म्यारो ट्रान्सप्लांट ऑपरेशनसाठी रुग्णालयाने 37 लाख रुपये खर्च सांगितला आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने दोन्ही मुलींवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पालकांनी केले आहे. या दोन्ही मुलींच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत व्हावी याकरीता कर्जत शहरातील मदर आय फाउंडेशनने छुमंतर या विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. शहरातील रॉयल गार्डन हॉलमध्ये झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाचा खर्च वगळता उरलेली सर्व रक्कम चिमुकल्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दिली जाणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार एक लाख 11 हजाराची आर्थिक मदत स्वरांजली आणि स्वराली जाधव यांना नाट्य प्रयोगानंतर देण्यात आली.