Breaking News

गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्‍या त्रिकुटाला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कर्जत येथे कारवाई

अलिबाग, नेरळ : प्रतिनिधी, बातमीदार

गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्‍या कर्जतमधील तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. रवींद्र आनंद वैद्य (वय 35), सौरभ सुनील नवले (वय 26), सुनील त्र्यंबक वाठोरे (वय 36, सर्व रा. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 25 हजार किमतीचा गावठी कट्टा, एक हजार किमतीची दोन काडतुसे, पंधरा हजार किमतीची पल्सर मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत-नेरळ रस्तामार्गे दोन व्यक्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गावठी कट्टा विक्रीस जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार राजेश पाटील यांना खबर्‍याकडून मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील याच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पथक नेमले होते. त्यानुसार कर्जत-नेरळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल (एमएच-46,व्ही-1489) वरून येणार्‍या रवींद्र वैद्य आणि सौरभ नवले यांना पथकाने अडवले. त्याची कसून तपासणी केली असता एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. अधिक चौकशी केली असता कर्जत गुंडगे येथे राहणार्‍या सुनील वाठोरे याच्याकडून गावठी कट्टा आणला असल्याचे त्या दोघांनी सांगितले. या तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे.

सौरभ नवले याच्यावर शिरवळ पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अटक आरोपीविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, अमोल हंबीर, देवराम कोरम, राकेश पाटील या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश धोंडे पुढील तपास करीत आहेत.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply