अलिबाग ः प्रतिनिधी
खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवारी (दि. 13) खोपोली येथील डीपी रोडवरील भव्य क्रीडांगणावर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन समारंभास खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे, सरचिटणीस सचिन मसुरकर, सचिव संजय तावडे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष तथा आरडीसीए सदस्य राजेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, माजी नगरसेवक चंद्रप्पा अनिवार, अविनाश तावडे, आरडीसीए सदस्य अॅड. पंकज पंडित, शंकर दळवी, संदीप जोशी, कौस्तुभ जोशी, अबू जळगावकार, विनायक तेलवणे, नईम मुकरी, सुहास वरजकार, संजय सोळंकी, उमाशंकर सरकार, रोहित कार्ले यांच्यासह क्रीडारसिक, खेळाडू उपस्थित होते. पहिल्या दिवशी पहिला सामना देवांश इलेव्हन पनवेल विरुद्ध खोपोली वॉरियर्स यांच्यात रंगला यामध्ये पनवेल संघाने अटीतटीच्या सामन्यात 17 धावांनी सामना जिंकला. दुपारच्या सत्रात झालेला सामना प्रदीप स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध बापदेव वरसोली-अलिबाग या संघांमध्ये खेळला गेला. त्यात पनवेल संघाने सामना 167 धावांनी एकतर्फी जिंकला. स्पर्धा आठवडाभर चालणार असून खोपोली विभागातील क्रीडा रसिकांसाठी क्रिकेटची पर्वणी ठरणार आहे.