पनवेल : बातमीदार
गुन्हे शाखा कक्ष 2च्या पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शहर पोलीस ठाण्यातील घरफोडी व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पनवेल येथील गुन्हे शाखा कक्ष 2चे पोलीस नाईक परेश म्हात्रे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष 2चे सपोनि शरद ढोले आणि पथक यांनी कामोठे परिसरात पाळत ठेऊन सदर ठिकाणी नजीर इब्राहिम नाईक (वय 26, कामोठे) या आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी एक लॅपटॉप, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक सिमकार्ड, एक हेअर ड्रायर, एक काळ्या रंगाची बॅग असा ऐवज मिळून आला.
आरोपीला मालासह पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे, तसेच खांदेश्वर पोलीस ठाणे येथील चोरीच्या गुन्ह्यातील तपासात उलवे येथून मुख्तार अली (वय 25) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी तीन हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.