खोपोली ः बातमीदार
लॉकडाऊनचा मुहूर्त साधत देशातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग असलेला मुंबई- पुणे मार्गावरील अमृतांजन पूल शनिवारपासून (दि. 4) पाडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे घाटातील प्रवास सुसह्य होणार आहे. पुलाच्या संपलेल्या वयोमर्यादेमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून पूल पाडणार आहे.
बोरघाटाचा अवघड वळणाचा रस्ता आणि खंडाळ्याच्या तोंडावर अमृतांजन पूल दगडी चिर्यात 1830च्या काळात उभारण्यात आला होता. 2000 साली द्रुतगती मार्ग तयार झाला. सहापदरी द्रुतगती मार्ग तयार करताना अमृतांजन पुलाला मात्र हात लावण्यात आला नाही, परंतु या ठिकाणी रस्ता वळणदार असल्याने कंटेनर, ट्रेलरसारख्या वाहनांचे सतत अपघात सुरू असतात. या ठिकाणी अपघातानंतर वाहतूक कोंडीच्या डोकेदुखीमुळे काही वर्षांपूर्वी पूल पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या, परंतु खोपोली, खालापूरसह सर्वच भागातून पुलाचे ब्रिटिशकालीन महत्त्व म्हणून पूल पाडण्यास तीव्र विरोध झाला. त्यामुळे पूल पाडायला स्थगिती आली होती. आता कोरोनामुळे लॉकडाऊनने संधी आली असून जिथे दररोज लाखोंच्या संख्येत वाहने धावतात तो आकडा केवळ शतकात आल्याने पूल पाडण्याचे काम सुरळीत होणार आहे.