Breaking News

जिल्ह्यात मुलांच्या लसीकरण मोहीमेस प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीमेस बुधवारी (दि. 16) अलिबाग नगर परिषद शाळेमध्ये प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील एक लाख 40 हजार 500 मुले असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांच्या उपस्थितीत अलिबाग नगर परिषद शाळेमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या वेळी नगर परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना कोर्बेवॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी पुढील काळात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना डोस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार बुधवारपासून रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

अलिबाग नगर परिषदेच्या सर्व सहा शाळांमधील स्वाती भुसाळे, संतोष आंबेतकर, प्रमिला म्हात्रे, सबिहा चिवीचकर, रफीका हळदेणकर, अनघा पाटील, ज्योती घरत यांच्यासह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील एक लाख 40 हजार 500 मुले असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा यांच्या समन्वयाने शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 12 ते 14 वयोगटातील सर्व मुलांनी लसीचा डोस घ्यावा.

-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply