Breaking News

दहावीच्या विद्यार्थिनीवर उपचारास उशीर

जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तणाव

पाली : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला अचानक बरे वाटत नसल्याने तिला जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टर व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी दहावीची एक विद्यार्थिनी रडत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्या विद्यार्थिनीला विचारणा केली असता, पोटात खूप दुखत असल्याचे तिने सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक युवराज सूर्यवंशी तसेच मिलिंद शिंदे, दीपक पवार, हरिचंद्र पाटील, नितीन परब व उपस्थितांनी तात्काळ या विद्यार्थिनीला जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र येथे डॉक्टर, आरोग्य सेविका किंवा आरोग्यसेवक उपलब्ध नसल्याचे दिसून आले. उपस्थित कर्मचार्‍यांना विचारणा केली असता डॉक्टर आल्या नसल्याचे सांगण्यात आले. येथील कर्मचार्‍यानेच विद्यार्थिनीला औषध दिले. त्यानंतर ही विद्यार्थीनी परीक्षा केंद्रावर गेली. यावेळी दीपक पवार यांनी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याची तक्रार सुधागड तालुका आरोग्य अधिकार्‍यांना केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी परीक्षा केंद्रावर गेले व त्यांनी त्या मुलीची आरोग्य तपासणी केली.

जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत नागरिकांच्या तक्रारीची शहानिशा केली जाईल. त्यात तथ्य आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

-डॉ. शशीकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply