धरमतर ते मांडवा 26 किमी अंतर केले पोहून पार
अलिबाग : प्रतिनिधी
रुद्राक्षी टेमकर या अवघ्या 11 वर्षीय मुलीने आज धरमतर ते मांडवा हे सागरी 26 कि.मी. अंतर पाच तास 54 मिनिटांत पोहून पार केले. रुद्राक्षी टेमकरच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
मूळची अलिबाग तालुक्यातील नवीन शहाबाज येथील रुद्राक्षी मनोहर टेमकर या 11 वर्षीय जलतरणपट्टूने शिवजयंतीच्या दिवशी नवा विक्रम करत छत्रपती शिवाजी महाराजांना आगळे वेगळे असे अभिवादन केले आहे. रुद्राक्षी ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया आणि एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया पोहून पार केले होते. त्यानंतर तिच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
रुद्राक्षीने सोमवारी मध्यरात्री दीड वाजता समुद्राच्या लाटांवर झेप घेत, धरमतर ते मांडवा हे सागरी 26 कि.मी. अंतर पोहून पार करत एक नवा विक्रम स्थापित केला आहे. धरमतर ते मांडवा जेट्टी पोहून पार करणारी रुद्राक्षी पहिली मुलगी ठरली आहे. रुद्राक्षीने हे अंतर पाच तास 54 मिनिटांत पूर्ण केले.
रुद्राक्षी टेमकर ही उरण येथील आरकेएफ जवाहरलाल नेहरु पोर्ट विद्यालय शेवा या शाळेत इंग्रजी माध्यमात सहावीत शिकत आहे. रुद्राक्षी धरमतर ते मांडवा सागरी अंतर पोहून जात असताना तिचे प्रशिक्षक हितेश भोईर, किशोर पाटील, विरेश मोडखरकर, दिवेश ठक्कर हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपच्या मोहिनी पाटील, रवींद्र म्हात्रे, विकास पाटील आणि रुद्राक्षीचे वडिल मनोहर टेमकर हेदेखील या वेळी तिथे उपस्थित होते. या सर्वांनी तिचे विशेष कौतुक केले.