आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात सन 2018-19मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील सन 2018-19 या आर्थिक वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद अधिकारी यांनी राज्य शासनाच्या 9 मार्च 2012च्या शासन निर्णयानुसार 12 नोव्हेंबर 2018च्या अटी शर्तीनुसार पनवेल, श्रीवर्धन व उरण तालुक्यातील प्रस्तावित केलेल्या कामांना आपणाकडून कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता. ही कामे सन 2018-2019मध्येच पूर्ण झाली असून, अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या कामांची देयके सादर करूनसुद्धा निधीचे वितरण करण्यात आलेले नाही.
रायगड जिल्ह्यातील सन 2018-19 या आर्थिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी लवकरात लवकर वितरित करण्याकामी संबंधित विभागाला जिल्हाधिकारी म्हणून आपणामार्फत आदेश व्हावेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.