ठिकठिकाणी प्रचार रॅली; कॉर्नर सभांद्वारे मतदारांशी संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रचार रॅली, कॉर्नर सभाद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधून बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यास मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील राजकीय वातावऱण चांगलेच ढवळून निघालेले आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यातही महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात हिरिरीने सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे बारणे यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 12) रसायनी परिसरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तसेच पदाधिकारी.
खारघरमध्ये महायुतीचा जयघोष
खारघर : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग (अप्पा) बारणे यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. या जयघोषात खारघरमधील प्रभाग क्र. 5 मधील भाजप, शिवसेना, रिपाइं कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, सभापती लीना गरड, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा सेना महानगर प्रमुख अवचित राऊत, उप महानगरप्रमुख दीपक घरत, भाजप शहर उपाध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, युवा चिटणीस अजय माळी, युवा नेता रवींद्र काकडे, अमर उपाध्याय, उत्तम मोरबेकर, वॉर्ड अध्यक्ष लखविर सिंग सैनी, सोशल मीडिया तालुका संयोजक विनय पाटील, शहर संयोजक गुरुनाथ म्हात्रे इत्यादी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासकामांच्या जोरावरच बारणे पुन्हा विजयी होणार
शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत यांचा दावा
रसायनी : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलेली विकासकामे त्याचबरोबर त्यांचा गावोगावी जनतेशी असलेला संपर्क आणि जनतेचा त्यांच्यावर असलेले प्रेम पाहता आगामी होणार्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे भरघोस मतांनी विजयी होतील, यात तीळमात्र शंका नसल्याचे रसायनी पाताळगंगा शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत यांनी विश्वास दाखविला. मावळ मतदारसंघाचे श्रीरंग बारणे यांना मतदारांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद, गावबैठकांत मतदारांचा उत्साह व पाठबळ, केलेली विकासकामे, सातत्याने जनसंपर्क आणि आम जनतेकडे जोडलेली आपुलकी प्रेमाचे नाते पाहता आगामी निवडणुकीत बारणे भरघोस मतांनी निवडून येतील, असे अजित सावंत म्हणाले. रसायनी पाताळगंगा परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. रसायनी पाताळगंगा परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले असून मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग आप्पा बारणे यांना विजय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत यांनी सांगितले.
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मतदारांशी संवाद
पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ त्यांचा मुलगा विश्वजीत बारणे हा उतरला असून काल त्याने पनवेल शहरातील कोळीवाडा येथे जाऊन देवीचे आशीर्वाद घेवून प्रचाराला सुरुवात केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला वेग चढला असून मोठ्या प्रमाणात शिवसेनेसह भाजप, आरपीआय, रासप व रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटीक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. त्या अनुषंगाने आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी विश्वजीत बारणेसुद्धा मैदानात उतरले असून त्यांनी आ. प्रशांत ठाकूर, गटनेते परेश ठाकूर व शिवसैनिकांच्या साथीने प्रचाराला सुरुवात केली. या वेळी कोळीवाड्यामध्ये त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. वाजत-गाजत प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबा व बारणेंना विजयी करा, असे आवाहन केले.
बारणेंच्या प्रचारासाठी आरपीआयने(डे) घेतली आघाडी
पनवेल : वार्ताहर : शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ आरपीआय डेमोक्रेटीक पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे हे आपल्या पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांसह सक्रिय झाले असून ते घराघरात जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. तत्पूर्वी महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मावळ येथे गेले होते. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे त्या परिसरातील नातेवाईकांशी संपर्क साधून धनुष्यबाणासमोरील बटन दाबण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल व उरण तालुक्यात बारणे यांचा प्रचार करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आखणी केली असून संपूर्ण ताकद त्यांनी उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी उभी केली आहे. यासाठी ते प्रत्येक गावागावात जाऊन मतदारांपर्यंत पोहचून बारणे यांना विजयी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून कोणीही कितीही गर्जना केल्या तरी प्रामाणिक उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे हेच विजयी होतील, असे भाकीत महेश साळुंखे यांनी वर्तविले आहे.