पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमध्ये कर्नाळा अभयारण्य परिसरात वनक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून वन्य प्राण्यांसह पक्षांची थ्रीडी चित्र रेखाटण्यात आली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणार्यांना अभयारण्यातून गेल्याचा भास होणार असून सेल्फी पॉइंटही बनविला आहे.
अभयारण्य परिसरात अगोदर 11 मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणाने तो 30 मीटर रुंदीचा झाला आहे. त्यामुळे अभयारण्य प्रवेशद्वारापासून महामार्ग उंचावला गेला आहे. या परिसरातील वळणावरून वाहने खाली जाऊ नयेत म्हणून 14 फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या संरक्षक भिंतीचा उपयोग करून या भिंतीवरच चित्रकार रवी साटम आणि त्यांच्या चार सहकार्यांनी गेल्या दीड महिन्यापासून ही चित्रे साकारली आहेत. तसेच चित्रांसह सुविचारांची पेरणी केली आहे. थ्रीडी चित्रे तसेच इतर कामासाठी सहा लाख खर्च करण्यात आला आहे. बाहेरील भिंतीवरील चित्रांकरिता अडीच लाख खर्च करण्यात आला आहे. यासाठी वापरलेला कलर पाण्यात धुतला जात नाही. प्रवेशद्वारापासून ते अभयारण्यात जाणार्या मार्गावर काय काय पाहाल, कुठल्या स्थानावरून कोणते प्राणी व पक्षी दिसतील याची माहिती, किल्ला, प्राणी व पक्षी यांची माहिती, रोपट्यापासून झाडांची निर्मिती कशी होते याविषयी 18 फलक लावण्यात आले आहेत.