52 मंजूर पदांपैकी तब्बल 47 पदे रिक्त
अलिबाग ़: प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात राज्य शासनाची 47 पदे रिक्त आहेत. केवळ पाच अधिकारी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भार वाहत आहेत. प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. तसेच 15 पैकी 13 गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. अधिकार्यांची पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार
मंदावला आहे.
रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने प्राथमिक विभागासाठी 35 पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी केवळ चार पदे भरली आहेत. 31 पदे रिक्त आहेत. माध्यमिक विभागात 22 पदे मंजूर आहेत. त्यापैकी शिक्षणाधिकारी हे केवळ एक पद भरले आहे. 21 पदे रिक्त आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी वेगळे शिक्षणाधिकारी पदे आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी पद भरले आहे. प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त भार सध्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे आहे.
प्राथामिक विभागात शिक्षणाधिकार्याचे एक पद मंजूर आहे, ते रिक्त आहे. उपशिक्षणाधिकार्यांची दोन पदे मंजूर आहेत, ती दोन्ही पदे रिक्त आहेत. अधिक्षक गट -ब यासाठी एक पद मंजूर आहे, तेदेखील रिक्त आहे. लेखाधिकारी, शालेय पोषण आहार यासाठी एक पद आहे, ते रिक्त आहे. प्रत्येक तालुक्यात एक असे एकूण 15 गट शिक्षणाधिकार्यांची पदे मंजूरआहेत. त्यापैकी केवळ दोन भरली आहेत, 13 पदे रिक्त आहेत. अधिक्षक, शालेय पोषण आहारच्या 14 पैकी दोन पदे भरली आहेत असून 12 पदे रिक्त आहेत. सांख्येकी एक पद आहे, तेदेखील रिक्त आहे. प्राथमिक विभागात 35 पैकी केवळ 4 पदे भरली आहेत. 31 पदे रिक्त आहेत.
माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी पद भरले आहे, मात्र उपशिक्षणाधिकारी वर्ग – 2, अधीक्षक गट ब वर्ग – 2, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, वाहन चालक प्रत्येकी एक पद मंजूर आहे, ही सर्व पदे रिक्त आहेत. प्रत्येक तालुक्यात एक समादेशक अशी 15 पदे मंजूर आहेत, ही सर्व पदे रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षण विभागात एकूण 22 पदे आहेत. त्यापैकी केवळ शिक्षणाधिकारी हे पद भरले गेले आहे. उर्वरित 21 पदे रिक्त आहेत. प्राथमिक व माध्यमिक विभागात मिळून एकूण 52 पदे आहेत. त्यापैकी केवळ पाच पदे भरली आहेत. 47 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा परिणाम शिक्षण विभागाच्या कामकाजावर होत आहे. पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाच्या कामाचा वेग मंदावला आहे.
राज्य शासनाने पद भरती केलेली नाहीत. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदांबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. आमचा राज्य सरकारशी पत्रव्यवहार सुरू आहे.
-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जि.प.