अलिबाग ़: प्रतिनिधी
वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड व कचर्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ही समस्या कायमच सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. डम्पिंग व कचरा मुक्त गावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्टींग मशीनचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रायगड हा ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जात असताना, जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रकल्प उभे राहिल्याने औद्योगिकीकरणदेखील वाढत आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या या जिल्ह्यांतील गावांमध्ये लोकवस्ती वाढू लागली आहे. मात्र बहुतांशी गावांमध्ये डम्पिंग ग्राऊंड नसल्याने अनेक जण मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. रस्त्याच्या बाजूला, तर काही ठिकाणी शेतांमध्ये कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात या कचर्यांमुळे पुरपरिस्थिती निर्माण होते.
डम्पिंग ग्राऊंड व कचर्याची समस्या कायमच निर्माण झाली आहे. पर्यावरणावर त्याचा मोठा परिणाम होतो. यामुळे वसुंधरेची मोठी हानी होते. मानवी आरोग्याबरोबरच राहणीमानावरही मोठा परिणाम होत आहे. कचर्याची ही समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकून अगळावेगळा उपक्रम गाव पातळीवर सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे.
रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 55 ग्रामपंचायतींना कंपोस्टींग मशीन पुरवठा करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविली जाणार आहे.
ओला व सुका कचरा वेगळा करून मशीनद्वारे कंपोस्टींग केली जाणार आहे. यातून सेंद्रीय खताची निर्मिती करून पर्यावरणाची हानी रोखण्यास मदत होणार आहे. न कुजणार्या प्लास्टीक पिशवी, बाटल्यांवर प्रक्रीया करून टाकाऊपासून टीकाऊ वस्तू तयार करणे अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून गावे, वाड्यांच्या परिसरात असलेला कचर्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांगावात जनजागृती करून कचरा मुक्तीसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील गावे, कचरा मुक्त होण्यास मदत होणार आहे.
माझी वसुंधरा ग्रामीण अभियानंतर्गत रायगड जिल्ह्यात वसुंधरा संवर्धनासाठी जनचळवळ सुरु केली आहे. केंद्र, राज्य सरकार, जिल्हा, तालुका व तसेच सीएसआर अशा वेगवेगळ्या माध्यमातून उपक्रम राबवून डम्पिंग ग्राऊंड व कचरा मुक्तीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. गावांतील कचर्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
-किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद