देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप
अमरावती ः प्रतिनिधी
अमरावती हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत आहे. ज्यांचा याच्याशी संबंध नाही अशा हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते रविवारी (दि. 21) अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमरावतीला दौर्यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शहरात दाखल झाल्यावर दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी नागरिक आणि व्यापार्यांशी चर्चा केली. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली, तसेच अमरावतीच्या विभागीय कार्यालयात जाऊन अधिकार्यांशीदेखील संवाद साधला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हिंसाचार प्रकरणावर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, अमरावतीतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. 12 तारखेला जो मोर्चा निघाला तो चुकीच्या माहितीच्या आधारे जाणीवपूर्वक राज्यभरात कारस्थान करून राज्याच्या विविध भागांमध्ये निघालेल्या मोर्चांपैकी एक मोर्चा होता. त्रिपुरामध्ये ज्या घटनाच घडल्या नाहीत त्या घटनांचे सोशल मीडियावर फेक क्रिएटिव्ह तयार करून त्यातून त्रिपुरात अल्पसंख्याक समाजावर हल्ला झालाय, मशिदी तोडण्यात आल्या आहेत, अशा प्रकारे फेकन्यूज तयार करण्यात आली. या गोष्टीचा पर्दाफाशही झाला आहे. जी मशिद जळताना दाखवली आहे ते सीपीआयएमचे एक कार्यालय असून त्याला आग लागली होती. कुराण जाळताहेत असे दाखवण्यात आले तो दिल्लीच्या एका कॅम्पमध्ये आग लागली होती तिथला फोटो होता. काही रोहिंग्यांचे फोटो होते, तर काही पाकिस्तानच्या एका शहरातील फोटो होते. यावरून देशभरात जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह तयार करण्यासाठी समाजाला भडकविण्यात आले.
आमचे स्पष्ट मत आहे की, इतके मोठे मोर्चे राज्यांच्या विविध भागांत निघतात हे काही आता ठरवले आणि लगेच मोर्चे निघाले असा प्रकार नाही. हे नियोजन करून काढलेले मोर्चे आहेत. नांदेड, मालेगाव, अमरावती यांसह राज्यातील इतर भागांमध्ये एकाच वेळी हे मोर्चे निघाले. म्हणून पहिल्यांदा याची चौकशी झाली पाहिजे की फेकन्यूजच्या आधारावर या मोर्चांचे नियोजन कोणी केले? त्यांची यामागची भूमिका काय होती? महाराष्ट्रात अशांतता पसरली पाहिजे या मानसिकतेतून केलेला हा मोठा कट होता का? याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यातलाच एक भाग म्हणून 12 नोव्हेंबरला एक मोर्चा अमरावतीमध्ये निघाला. याला परवानगी होती की नाही, असेल तर परवानगी कोणी दिली होती याची चौकशी केली पाहिजे, अशीही मागणी फडणवीस यांनी या वेळी केली.