विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारला ज्या कामांमध्ये मलिदा खाता येतो त्या कामात रस आहे. आरोग्याच्या बाबतीत त्यांनी लोकांना रस्त्यावर सोडले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून दक्षिण-मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळवासीयांच्या आरोग्यसेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. 16 ठिकाणच्या 76 वस्त्यांच्या सेवेत एक डॉक्टर, एक कंपाऊंडर असेलेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेचे ‘चालता-फिरता दवाखाना’च्या रूपात मंगळवारी (दि. 29) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
भाजपच्या दादर येथील कार्यालायाबाहेर झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपल्याला चालता फिरता दवाखाना सुरू करावा लागतो, कारण राज्यातील सरकार चालत, हलत, डुलत नाही आणि त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. आमच्या सरकारने महात्मा फुले जनारोग्य योजना आणली. 2019मध्ये या योजनेध्ये तब्बल 500 कोटी खर्च केले. कोरोनाच्या वर्षी 2020मध्ये या योजनेत अधिक पैसे खर्च होणे अपेक्षित होते, पण आश्चर्य म्हणजे त्या वर्षी केवळ 350 कोटी रुपये खर्च झाले. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत, जेजेसारख्या रुग्णालयात रुग्णांना पॅरासिटामोलसारखी गोळीही बाहेरून आणायला सांगितले जाते, एवढी वाईट परिस्थिती आहे.
प्रशिक्षित डॉक्टर या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. आज आरोग्यसेवा खर्चिक झाल्या आहेत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गाला या फिरत्या दवाखान्याच्या मोठा फायदा होणार आहे. दर्जेदार आरोग्यसेवा घरपोच मिळणार आहे. कोरोना काळात भाजपने सर्वतोपरी रुग्णसेवा केली. तोच वसा आमदार प्रसाद लाड पुढे चालवत आहेत याचा मला अभिमान आहे, असे फडणवीस यांनी या वेळी नमूद केले.