रोहे : प्रतिनिधी
उन्हाळ्यात जंगलातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनच्या वतिने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात्रेत टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या एकत्र करुन फांउडेशनच्या कार्यकर्त्यानी त्या जंगलात टांगून ठेवल्या आहेत. त्यात पाणी साठवण करण्यात येत असल्याने जंगलातील पक्षांची तहान भागत आहे. या उपक्रमाबद्दल स्वामीराज फांउडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जंगलातील पाण्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेवून, फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी पर्यावरण संगोपन विभागाअंतर्गत टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना राबवण्याचे ठरवले. या संकल्पनेतून पक्षांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे. महादेववाडी येथील महादेव मंदिर यात्रेनंतर फांउडेशनच्या कार्यकर्त्यानी त्या परिसरातून 100 ते 150 प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या. व त्या दुर्गम जंगल भागात लावल्या आहेत. त्यात हे कार्यकर्ते नियमित पाणी साठवण करतात. त्यातून जंगलातील पक्षांची तहान भागत आहे. या उपक्रमसाठी स्वामीराज फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश माने, उपाध्यक्ष दीपक माळी, सेक्रेटरी उत्तम माने, खजिनदार मारुती चव्हाण, महेश चव्हाण, विनायक माने, योगेश नवसे, शैलेश चव्हाण, चिंतामणी माने, हृषीकेश माने, गीतेश नवसे, रोशन माने, महेश वाळंज, संजीवनी माने, कविता चव्हाण, माही चव्हाण रातिका वाळंज, मोनाली चव्हाण, अजंती चव्हाण यांनी परिश्रम घेतले.