
महाड : प्रतिनिधी
परीक्षा संपताच महाडमधील मुलांची पावले बगीच्याकडे वळली मात्र बगिच्यांची झालेली दुरवस्था पाहून बच्चेकंपनी चांगलीच नाराज झाली आहे. महाडमध्ये असलेल्या बागांची दुरावस्था झाली आहे. शहरात छत्रपती शिवाजी चौकातील एकमेव बाग सध्या सुरु असते मात्र या बागेतील खेळणी मोडली आहेत. शहरातील इतर बगीचे तर ओस पडले आहेत. विविध ठेक्याच्या रूपाने महाड नगर पालिका या बगीच्यांवर लाखो रुपये खर्च करत आहे.
महाडमध्ये छत्रपती शिवाजी चौकातील राजमाता जिजामाता गार्डन, दादली पुलाजवळील छत्रपती शिवाजी उद्यान अशा दोनच बागा आहेत. यातील राजमाता जिजामाता गार्डन, चवदारतळे येथील खुल्या प्रांगणातच लहान मुलांना मनमोकळे खेळता येते. इतर बगीच्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.
परीक्षा संपताच लहान मुलांची पावले या बगीच्यांकडे वळतात. महाडमध्ये लहान मुलांची आवडती खेळणी असलेली राजमाता जिजामाता गार्डन ही एकमेव बाग आहे. या बागेत फुलांचा पत्ता नसला तरी मुलांची मात्र खेळण्यासाठी गर्दी असते. मात्र या बागेतील खेळणी जुनी झाली असून, ती धोकादायक स्थितीत आहेत. ही सर्व खेळणी लोखंडी असल्याने वरील पत्रा गंजून गेला आहे. गंजलेल्या पत्र्याचा भाग मुलांच्या जीविताला धोकादायक ठरत आहे. हा पत्रा लागून गेल्या वर्षी दोन ते तीन लहान मुले जखमी झाली होती. तक्रारी करूनदेखील याकडे महाड नगर पालिका दुर्लक्ष करत आहे. महाडमध्ये राजमाता जिजामाता गार्डन, दादली पूल येथील बाग, चवदारतळे येथील खुले प्रांगण या ठिकाणीच मुलांना खेळण्यासाठी जागा आहेत. यातील दादली पुलानजीक असलेल्या बगीच्याचे काम गेली अनेक वर्ष अर्धवट अवस्थेत पडून असून येथील वीज, बाग देखभाल, आदीवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. शिवाय हे उद्यान गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. स्वच्छता नसल्याने या बागेकडे बच्चेकंपनी आणि त्यांच्या पालकांनी पाठ फिरवली आहे. हे उद्यान बंद असले तरी देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिमहिना 12,750 रुपये खर्च केला जातो. येथील वीज व्यवस्थेवर देखील खर्च टाकला जात आहे. चवदारतळे येथील खुले प्रांगण केवळ बसण्यासाठी आणि लहान मुलांना स्वैर फिरण्यासाठी आहे. याठिकाणी कोणतीच खेळणी नसल्याने इथेही फारशी गर्दी होत नाही. चवदारतळे येथील मागील बाजूला नाना नाणी पार्कचे काम केले मात्र त्याचीदेखील दुरवस्था आहे.
राजमाता जिजाऊ गार्डन शेजारील नाल्याचा संरक्षक कठडादेखील तुटला आहे. तेथील देखभाल दुरुस्तीसाठी सन 2017 मध्ये काढलेली निविदा आणि नेमण्यात आलेला ठेकेदार आजही कायम आहे. येथील खराब अवस्थेतील खेळणी काढून टाकली असली तरी नवीन खेळणी अद्याप बसवलेली नाहीत. याठिकाणीदेखील देखभाल दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला प्रतिमहिना 48,750 रुपये दिले जातात. त्यामध्ये शिवाजी चौक येथील सर्कल, अर्धपुतळा, आणि बगीचा यांच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे.
– बगिचांच्या देखभाल-दुरुस्तीचा नवीन प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी जवळपास तीन कोटीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. लवकरच नवीन खेळणी बसवली जातील. तसेच चवदारतळे सुशोभीकरण कामाचादेखील समावेश केला आहे. निधी प्राप्त होताच कामे पूर्ण होतील. – सुहास कांबळे, अभियंता, महाड नगर