Breaking News

सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान व्हावा

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : प्रतिनिधी

बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 3) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदू म्हणजे बुरसटलेले, असे देशात सातत्याने पुस्तके, शिक्षण व भाषणातून मांडले गेले. जातीय तेढ निर्माण होऊ नये हे केवळ हिंदूनी सांभाळले पाहिजे असे झाले, पण सर्वधर्मसमभाव म्हणजे केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा पण हिंदूंचा सन्मान करायचा नाही, असे चालणार नाही. तुम्ही आमच्या आरतीचा सन्मान करा, आम्ही तुमच्या अजानचा सन्मान करू. आपण एकत्र प्रेमाने राहू. पण सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या भाषणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे. शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याचा धोका आहे.

त्यांनी सांगितले की, अधिकार्‍यांनी कोल्हापुरातील दारू दुकानदारांची बैठक घेऊन काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे, परंतु आम्ही सरकारी अधिकार्‍यांना याचा जाब विचारू.

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा जोरदार प्रचार

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गती आली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार 4 व 5 एप्रिल रोजी प्रचारात भाग घेतील. भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे 6 एप्रिल रोजी प्रचार करतील. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर 7 एप्रिल रोजी सभांना संबोधित करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे 9 व 10 एप्रिल रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी येतील. याखेरीज पक्षाचे अनेक नेते मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply