पनवेल : प्रतिनिधी
पनवेल परिसरातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात झाला आहे. या ठिकाणी काम करणार्या जबाबदार कर्मचार्यांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुख्यालय पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालय मात्र चालूच राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिकेमध्ये आकृतीबंध मंजूर न झाल्याने अत्यंत मर्यादित कर्मचारी वर्ग आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून कोरोना विरोधात लढा सुरू आहे. 10 मार्च 2020 पासून कोरोना साथरोग नियंत्रणासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी, या कामासाठी खास करून नियुक्त केलेले डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोणत्याही सुटी शिवाय ते कर्तव्य बजावत आहेत. अखंडितपणे चार महिने काम करीत असताना पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील काही कर्मचारी व कोरोनासाठी स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षातील काही जबाबदार कर्मचारी यांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवार (दि. 10) व शनिवार (दि. 11) हे दोन दिवस महानगरपालिकेचे मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. क्षेत्रीय पातळीवर काम करणारे सर्व आरोग्य केंद्र सुरू राहणार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी संबंधित पथके व महानगरपालिकेमधील कार्यरत अधिकारी त्यांचे काम दूरध्वनीवरून किंवा घरी राहून पाहतील असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.