Breaking News

सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच

देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

गडचिरोली : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 4) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारमध्ये सध्या भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या वतीने गडचिरोली येथून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोना काळात आदिवासींना मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो, पण, राज्य सरकारने दारू दुकानदारांना मदत केली. या सरकारने गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबारच्या शेतकर्‍यांचे 50 टक्के वीज बिलही माफ केले नाही. राज्य सरकार आपला आवाज दाबू शकत नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिम्मतही नाही. आम्ही जनतेवर अन्याय सहन करणार नाही आणि अन्याय झाला तर ही जनता तख्त पालटून टाकेल.
विरोधी पक्षनेते फडणवीस पुढे म्हणाले, हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. सरकारमध्येच सध्या भ्रष्टाचाराची ट्वेन्टी-20 मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच आहेत. जिथे जाऊ तिथे खाऊ असे हे सरकार आहे. आम्ही सांगितले, मुंबईतून बिल्डरांचा थकलेला कर घ्या आणि शेतकर्‍यांना वीज द्या, पण हे सरकार बिल्डरांवर मेहरबान आहे, कारण ते त्यांना मालपाणी देतात. कोरोना काळात यांनी बारमालकांचे भले केले. या सरकारने दारू लायसन्सचे 50 टक्के शुल्क रद्द केले, विदेशी दारुवरचा कर अर्धा केला. महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार आहे, त्यांना बेवड्यांचे हित जास्त आहे.
राज्य सरकारने वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांनाही मदत देण्याची घोषणा केली, मात्र  यातही पैसा खायचे काम त्यांनी सोडले नाही. सरकारच्या निकटवर्तीयांना, जवळच्या संस्थांना हा निधी दिला. मी स्वत: नांदेडमधील घटनेचा उल्लेख विधानसभेच्या अधिवेशनात केला होता. सरकारने वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांना मिळणारा निधी हडप केला. म्हणजे या सरकारला काय म्हणावे, मी तो शब्द उच्चारणार नाही, अशी बोचरी टीकाही फडणवीसांनी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply