Breaking News

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. गेले दीड वर्ष पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष करीत आहे, मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 व 10 रुपयांची कपात केली. त्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण 25 राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला, मात्र महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही. पेट्रोल- डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply