देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका
मुंबई : प्रतिनिधी
काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत असेही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून होणार्या आरोपांचा समाचार घेतला. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचे आणि मराठी माणसाला लुटायचे हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट होत आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत मापे घेण्यात आली, नसलेल्या नोटीसी देण्याचे काम झाले. तरी आम्ही कायद्याने मुकाबला करण्याची भूमिका घेतली. जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारे नोटीस दिली असून कायदेशीर नोटीस मिळाली असताना कायद्याने उत्तर दिले पाहिजे. भावनिक उत्तर दिल्यास त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही, असे फडणवीस या वेळी म्हणाले.
पत्रावाला चाळ गरीब मराठी माणसाचा प्रश्न होता. अनेक वर्षे हा प्रश्न भिजत पडला. ज्यांनी स्वत:ला गरीब माणसांचा मसिहा घोषित केले, त्यांनीच गरिबांचे इंटरेस्ट बिल्डरांच्या घशात घातले, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
दरम्यान, संजय राऊतांनी यांनी भाजप नेते माजी कासदार किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले. ते कोणत्याच आरोपाचा पुराव देऊ शकले नाहीत. राज्य सरकारकडून सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, चुकीची कारवाई करता येणार नाही. कितीही दबावाची कारवाई केली तरी सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.