पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारला आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील यांना एक, दोन नव्हे तर तीनदा पराभूत केले आहे. लाल बावट्याचा गड उद्ध्वस्त करणार्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने सलग चौथ्यांदा पनवेलकरांनी कल दिला आहे. विरोधकांनी अपप्रचारातून मोठी फिल्डिंग लावली असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयाचा स्ट्रेट ड्राइव्ह मारत विजय संपादन केला. त्यांच्या अभिनंदनासाठी 23 नोव्हेंबरपासून निवासस्थानी आणि कार्यालयामध्ये सकाळपासून नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, त्याचबरोबर इतरांनी अक्षरशः गर्दी केलेली आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबरच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनाही भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी लोकसमुदाय दिसून येत आहे. पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूर कुटुंबीय सक्रिय आहे. सर्वांच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठीशी जनमत असल्याचे सर्वज्ञात आहे.
सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी कायम केले आहे. सर्व समाजाला मानणारे असे ते व्यक्तीमत्व आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेली कामे आदर्श अशी आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली. त्यांनी केलेल्या संकल्पनेनुसार खारघरमध्ये नाट्यगृह उभारले जाणार आहे. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी नाट्य, कला, सांस्कृतिक क्षेत्राला अधिक चालना मिळणार आहे. अशी लोकहिताची कामे आमदार प्रशांत ठाकूर करत आहेत. त्याबद्दल आणि पुन्हा विजयी झाल्याबद्दल पुनःश्च त्यांचे अभिनंदन!
-रायगड भूषण उमेश निवृत्तीबुवा चौधरी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांना पनवेलची जनता साक्षीदार आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. आज त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. चारवेळा आमदार झाले असतानाही त्यांच्या वागण्यात बडेजाव आला नाही. त्यांना सर्वसामान्य माणसाची जाण आहे.
– वैशाली जगदाळे, संस्थापिका,
संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्था