लँडस्केप पेंटिंग स्पर्धेत देशातील चित्रकारांचा सहभाग; विजेत्यांमध्ये जेजे स्कुलचे वर्चस्व
कर्जत : बातमीदार
लँडस्केप पेंटिंग स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर साकारला असून या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मात्र मुंबईतील सर जेजे स्कुल ऑफ आर्टसच्या चित्रकारांचे वर्चस्व राहिले.
माथेरानचा निसर्ग कोणत्याही चित्रकाराला आकर्षित करणारा आहे. येथील निसर्गप्रेमी प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून गेली पाच वर्षे लँडस्केप पेंटिंग ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. मागील दोन वर्षे कोविडमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. पण यावर्षी सर्व राज्यातील चित्रकारांनी प्रतिसाद दिल्याने या स्पर्धेची रंगत वाढली. देशाच्या विविध भागातील 82 चित्रकार आदल्या दिवशी माथेरानमध्ये पोहचले होते आणि त्यांनी निसर्गचित्र काढण्याची जागा निश्चित केली. त्यानुसार माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर उतरण्यास सकाळपासून सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता काढलेली चित्रे परीक्षक चित्रकार वैभव नाईक आणि अमित ढाणे यांच्याकडे जमा केली. ही सर्व चित्रे आयोजकांनी माथेरानच्या मध्यवर्ती भागातील श्रीराम चौकात पर्यटक आणि माथेरानकर यांच्यासाठी प्रदर्शित केली. त्या सर्व चित्रांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार पराग बोरसे यांनी नजर फिरवली आणि सर्वांचे कौतुक केले.
माथेरानच्या प्रशासक सुरेखा भणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी विजेत्यांना पारितोषिके दिली.
सर जेजे स्कुल ऑफ आर्टस्ची छाप
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये पहिली तिन्ही बक्षिसे मुंबईतील सर जेजे स्कुल ऑफ आर्टसच्या विद्यार्थी राहिलेल्या चित्रकारांना मिळाली. पहिला क्रमांक स्वप्नील पाटे, द्वितीय क्रमांक संकेत थोरात आणि तृतीय क्रमांक अजित राऊत यांनी पटकावला. दीपक कुमार शर्मा (पुणे), नेहा ताडकापल्ली (मुंबई), वैभव गायकवाड (नाशिक), आकाश खेतावत (ठाणे), प्रणय फराटे (रत्नागिरी) यांना उतेजनार्थ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. माथेरानमधील श्रुती घावरे आणि पौर्णिमा कदम यांना विशेष सन्मानित करण्यात आले.