मुरूड : प्रतिनिधी
प्रकल्पग्रस्त बाधित मच्छीमार बांधवांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) कडून न्याय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केली.
रायगड जिल्ह्यातील थळ व नवगाव येथील आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांबाबत आमदार रमेश पाटील यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेतली. यासंदर्भात पुढील महिन्यात मुंबईत संबंधीतांची बैठक आयोजित करून प्रकल्प बाधित मच्छीमारांचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री खुबा यांनी या वेळी दिले.
आरसीएफच्या मरिन आउट फॉल पाईपलाईनमुळे रायगड जिल्ह्यातील थळ नवगाव येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचे गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हे स्थानिक प्रकल्पग्रस्त मच्छिमार बांधव मदत मिळण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
मात्र कंपनीकडून मदत मिळत नसल्याने ते हैराण झाले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांची दिल्लीत भेट घेतली.
आरसीएफ कंपनीने मच्छीमार बांधवांना जेटी, रस्ते, दिवाबत्ती व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र आजतागात त्यांनी या आश्वासनांची पूर्तता केलेली नसल्यामुळे मच्छीमार बांधव आजही या सुविधांपासून वंचित आहेत.
यासंदर्भात पुढील महिन्यात महाराष्ट्रात आल्यानंतर संबंधीतांची बैठक आयोजित करून आरसीएफ प्रकल्पग्रस्त मच्छिमार बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी आमदार रमेश पाटील यांना या वेळी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून आरसीएफ प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची भेट घेतली, त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच या मच्छिमारांना न्याय मिळेल.
-आमदार रमेश पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, कोळी महासंघ