चेन्नई : वृत्तसंस्था
कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरचे कौतुक करताना मिश्किल टिप्पणी केली आहे. हरभजन आणि ताहिर हे जुन्या दारूसारखे आहेत. दिवसेंदिवस ते परिपक्व होत चालले आहेत. वय हा केवळ एक आकडा आहे हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलेय, असे धोनी म्हणाला.
गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सुरेख खेळ करीत चेन्नईने कोलकाताला पराभवाची धूळ चारली. या लढतीनंतर धोनीने हरभजन आणि ताहिरचे कौतुक केले. वय या दोघांच्याही बाजूने आहे. ते जुन्या दारूसारखे आहेत आणि सातत्यानं परिपक्व होत आहेत. भज्जीने आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मला जेव्हा गरज भासली त्या वेळी ताहिरवर विश्वास ठेवला आणि त्यानंही जबरदस्त कामगिरी केली, असे धोनी म्हणाला.