पोलिसांकडून कारवाई; संदीप देशपांडे यांची टीका
मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी (दि. 10) थेट मुंबईतील शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण केले. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत रामनवमीचे औचित्य साधून मनसेने भोंगा लावून हनुमान चालीसाचे पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली आहे. यावर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मनसेने शिवसेना भवनसमोर हनुमान चालीसा पठण केल्याने पोलिसांनी यशवंत किल्लेदार आणि इतर मनसैनिकांना ताब्यात घेतले. सोबतच भोंगा जप्त केला. यानंतर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. शिवसेना भवन ही काही मशीद नाही, ज्याच्यासमोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचे पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पध्दतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. रामनवमीनिमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का, असा सवालदेखील देशपांडे यांनी केला आहे.