विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
कोल्हापूर ः प्रतिनिधी
हिंदूत्ववादी शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकार्याकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 10) येथे केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोबत होते. शिवसेनेच्या हिंदुत्वासंबंधीच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हनुमान चालीसा ही आपल्या देशाची एक परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो? भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर हनुमान चालीसानेही राग यायला नको. शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. ज्या वेळी शिवसेनेनच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असे नाव छापले त्याच वेळी हिंदूत्ववादी असलेली शिवसेना ही धर्मनिरपेक्षवादी झाली. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही, पण लांगुलचालनाला आमचा विरोध आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. कोल्हापूरमधील जनतेच्या मनात राज्य सरकारविरोधात मोठा आक्रोश आहे. कोल्हापूरकरांसाठी एकही चांगले काम या सरकारने केलेले नाही. महापुरात मागील सरकारने जशी मदत केली तशी आता पुन्हा केली जावी अशी नागरिकांची अपेक्षा होती, मात्र या सरकारने पूरग्रस्तांना काहीही मदत केली नाही. याचा परिणाम पोटनिवडणुकीच्या निकालात दिसून येईल. ही पोटनिवडणूक जिंकत राज्यातील भाजपचा 107वा आमदार निवडून येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाबाबतच्या आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. आम्ही आंदोलनात एसटी कर्मचार्यांच्या सोबत होतो. सातत्याने त्यांची मागणी लावून धरली होती, पण सरकारने आडमुठी भूमिका घेतली. पाच महिने हा संप चिघळवत ठेवला. कर्मचार्यांचा हा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय, पण शरद पवारांच्या घरी घडलेली घटना चुकीची होती. तिचा आम्ही निषेधच करतो, असे ते म्हणाले. तेथे लोकं जाणार असल्याचे पत्रकारांना माहिती होते. घटना घडताना सगळी प्रसारमाध्यमे उपस्थित राहिली, मात्र पोलीस कसे काय झोपले होते, असा सवालही फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करावा लागतोय -चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सरकार टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार टिकवण्याचा शिवसेना आटोकाट प्रयत्न करीत आहे, मात्र मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करावा लागला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरचा दौरा करीत प्रचार केला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते बनण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही, असे त्यांनी म्हटले तसेच हिंदुहृदयसम्राटऐवजी जनाब तुम्हीच लावत आहात, असा टोमणाही त्यांनी मारला. भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भगव्याला मत द्या सांगत एक प्रकारे भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापुरची जागा हिंदूत्व न मानणार्या काँग्रेसकडे जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे.