अलिबाग : प्रतिनिधी
महसूल कर्मचार्यांचा संप आठव्या दिवशीही सुरूच आहे. रायगडातील महसूल कर्मचार्यांनी सोमवारी (दि. 11) आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महसूल कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आठ दिवसांनंतरही हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सोमवारी अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात संपकरी कर्मचारी सुरुवातीला जमले. त्या ठिकाणी त्यांची छोटेखानी सभा झाली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाऊन राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अव्वल कारकून व मंडल अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया रद्द करावी, अव्वल कारकून किंवा मंडल अधिकारी यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती झाल्यानंतर त्यांना त्या त्या विभागातच पदस्थापना देण्यात यावी, संघटनेच्या पदाधिकार्यांना बदली प्रक्रियेत संरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत
दरम्यान, आंदोलनाच्या वेळी महसूल कर्मचारी पत्रकारांवर घसरले. आमच्या बातम्या उद्या पेपर आणि टीव्हीवर दिसल्या पाहिजे; अन्यथा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार झोपलेला आहे किंवा त्यांनी झोपेचे सोंग
घेतले आहे म्हणावे लागेल, असे एका पदाधिकार्याने म्हटले. या वक्तव्याचा पत्रकारांनी निषेध केला. त्यानंतर या कर्मचार्याने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष केतन भगत यांनीही घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …