Breaking News

मुंबई-पुणे महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

खोपोली : प्रतिनिधी

पावसाळ्यात धोकादायक बनणारा जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे उपचार सुरू झाले असून, अपघात प्रवणक्षेत्रात मिलिंग यंत्राचा वापर करून रस्ता सुरक्षित करण्याचे काम आयआरबीने हाती घेतले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर ते दांडफाटा या चौदा किलोमीटर पट्टयात पावसाळ्यात सातत्याने अपघात घडत आहेत. या महामार्गावर 2018 मध्ये करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे खालापूर हद्दीतील रस्त्याचा पृष्ठभाग काही ठिकाणी अतिशय गुळगुळीत आणि निसरडा झाला होता. दांड फाटा ते खालापूर या दरम्यान पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढत असून ठराविक ठिकाणीच सातत्याने अपघात होत असल्याने अपघाताच्या हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी दुरुस्तीची गरज होती. डांबरीकरणाच्या वेळी झालेल्या तांत्रिक चुकीमुळे पावसाळ्यात वाहने अनियंत्रित होऊन पलटी होण्याचे प्रमाण वाढले होते. 2019 मध्ये मिलिंग मशिनच्या सहाय्याने महामार्ग काही ठिकाणी खडबडीत करण्यात आला होता.  मात्र हे काम पूर्ण न झाल्यामुळे लोधीवली, वावंढळ, विणेगाव तसेच खालापूर हद्दीत पावसाळ्यात अपघात घडले होते. रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी काम करणार्‍या दिलासा फाउंडेशनकडून याठिकाणी दुरुस्तीसाठी आयआरबी अभियंत्यांकडे पाठपुरावा सुरु होता.

अपघात घडणार्‍या ठिकाणी मिलिंग यंत्र वापरून रस्त्याचे काम करण्यात येईल, असा शब्द आयआरबी अभियंता अभय पावसकर यांनी दिला होता. त्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरपासून मिलिंग यंत्राने काम सुरू झाले आहे. पावसाळा संपताच शेडुंग ते खालापूर महामार्गावर  डांबरीकरणाचा थर करण्यात येणार आहे. -अभय पावसकर, अभियंता, आयआरबी

मुंबई-पुणे महामार्गावरून मी नेहमी प्रवास करतो. गेल्यावर्षी पावसाळ्यात खालापूर खडीमशीनजवळ वेग जास्त नसतानादेखील ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक लागला नाही आणि गाडी पलटी झाली. त्यानंतर त्याठिकाणी सातत्याने अपघात घडत होते. -गजानन गुणाजी शिंदे, प्रवासी, खालापूर

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply