खोपोली-कर्जत प्रवास कंटाळवाणा
खोपोली : प्रतिनिधी
मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असलेले शहर म्हणजे खोपोली. या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरातून थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची लोकल सेवा आहे. त्यामुळे मुंबईला जाणार्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यामानाने लोकल ट्रेनची संख्या अपुरी आहे. एक लोकल सुटली की, एक तासाने दुसरी लोकल आहे.
खोपोली-कर्जत हा प्रवास वीस मिनिटांचा मात्र काही दिवसापासून या प्रवासाला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत असल्याने, हा प्रवास दिवसेंदिवस कंटाळवाणा होत आहे. त्यामुळे मुंबईला जाणार्या प्रवाशांना, विद्यार्थ्यांना पुढील कनेक्टेड गाडी मिळत नाही. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
खोपोलीवरून सुटणार्या अनेक लोकल गाड्या सध्या विलंबाने सुटत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. अनेकदा गाडी केळवली व पळसदरी या दोन स्थानकादरम्यान कधी कधी काही कारण नसताना बराच वेळ थांबवली जाते तर पुढे पळसदरी ते कर्जत या दरम्यानही अनेकदा लोकल थांबविली जाते. पुढील कर्जतपर्यंतचा प्रवास रखडत रखडत करावा लागतो. परिणामी मुंबईला जाणार्या प्रवाशांच्या कर्जत-मुंबई या कनेक्टेड गाड्या डोळ्यासमोरून सुटतात. त्यामुळे अनेक प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वे प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी खोपोली-मुंबई प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत. जर तात्काळ याबाबत सुधारणा झाली नाही तर कधीही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो, अशी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.