अलिबाग ः प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे बुधवारी (दि. 13) अलिबागमध्ये संविधान जागर यात्रा काढण्यात आली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 6 ते 16 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार रायगड जिल्ह्यात पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणून 13 एप्रिल रोजी अलिबाग येथे संविधान जागर यात्रा काढण्यात आली. अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पुतळ्या आभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ यात्रेची सांगता करण्यात आली. संविधान जागर यात्रेत महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संघटनाचे पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.