आमदार प्रविण दरेकर यांचा हल्लाबोल; बिरवाडीत महायुतीची प्रचार सभा
महाड : प्रतिनिधी
सुनिल तटकरे यांनी रायगडचा विकास केला नाही, उलट राज्यात मंत्री असताना त्यांनी 70 हजार कोंटींचा भ्रष्टाचार करुन रायगडला बदनाम केले आहे, अशी घणाघाती टिका आमदार प्रविण दरेकर यांनी बिरवाडी येथे केले.
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (दि. 16) सायंकाळी महाड तालुक्यातील बिरवाडी येथे आयोजीत केलेल्या जाहीर सभेत आमदार दरेकर बोलत होते. महाड एमआयडीसीमध्ये प्रोसेसिंग प्रकल्प उभा करुन रोजगार निर्मिती करणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. टेहळणी करणारा उपग्रह पृथ्वीवरुन पाडण्याची ताकद आमच्याकडेही आहे, हे मोदींनी जगाला दाखवून दिले आहे. केवळ मोदीच देशाच संरक्षण करु शकतात, असा दावा करुन आमदार दरेकर यांनी, माजी मुख्यमंत्री कै. बॅ. अतुलेंच्या पाठीत खंजीर खुपसणार्याचा बदला घेण्यासाठी आता इथला मुस्लिम सज्ज झाला असल्याचे सांगितले. काँग्रेस आघाडी ही घटकपक्षांतील कार्यकर्त्यांच्या मनाविरुध्द झाली आहे. त्यामुळे त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सोबत असल्याचा दावा अनंत गीते यांनी केला. इंदापुर ते गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरण, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, रोहा उपनगरी रेल्वे सेवा या कामांच्या उद्घाटनासाठी हेच तटकरे व्यासपिठावर माझ्या सोबत बसले होते आणि म्हणतात गीतेंनी काय केले? महाड बस स्थानक नुतनीकरण, दिघी रस्ता ही कामे त्यांना दिसत नाहीत का? तालुक्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेची काम कुणाची आहेत? असे सवाल करुन गीते यांनी तटकरे यांचा या वेळी चांगलाच समाचार घेतला. तटकरे म्हणजे विश्वासघात करणारा भ्रष्ट नेता असल्याचा आरोप उदय आंबोणकर यांनी केला. तर सुनिल तटकरे यांचा भविष्यातला पत्ता कोलाड नसून जेल आहे, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले यांनी सांगितले. जिल्हायुवा अधिकारी विकास गोगावले यांचेही यावेळी भाषण झाले. महाड पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे, भाजप तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, पद्माकर मोरे, विजय सावंत, सुरेश महाडीक आदि पदाधिकार्यांसह बिरवाडी परिसरातील ग्रामस्थ या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरगरीबांसाठी योजना आणि विकास केवळ भाजप युतीच्या सरकारने केला आहे. कोकणची जनता विचारपुर्वक मतदान करीत असते. सुनील तटकरे या कोकणच्या जनतेला विकत घेऊ शकत नाहीत.
-प्रविण दरेकर, आमदार
भाजप, सेनेची घट्ट युती झाली आहे. भविष्यात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यत ही युती कियम राहिल. सुनिल तटकरेंना पाडण्यासाठी या महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत.
-भरत गोगावले, आमदार, महाड