श्रीलंका ः वृत्तसंस्था
ईस्टर बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या दानिश सिद्धीकी या भारतीय पत्रकाराची सुटका करण्यात आली आहे. तीनच दिवसांपूर्वी त्याला परवानगीशिवाय घटनास्थळाची तपासणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
दानिश सिद्धीकी हा रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पत्रकार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ईस्टरच्या संध्याकाळी श्रीलंकेत आठ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 250हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. या स्फोटांनंतरच्या परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी दानिश सिद्धीकी श्रीलंकेत गेला होता. निगोम्बो शहरातील एका शाळेतील काही विद्यार्थी या स्फोटात मृत्युमुखी पडले होते. त्यांची माहीती काढण्यासाठी दानिश संबंधित शाळेत गेला होता. परवानगीशिवाय तो फक्त शाळेच्या आवारात शिरलाच नाही, तर त्याने तेथील फोटोही काढले.
सध्या श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अशा वेळी प्रशासनाकडून कोणताही परवाना न घेता तेथील शाळेत मुक्तपणे हिंडल्यामुळे दानिशला ताबडतोब अटक करण्यात आली, तसेच या गुन्ह्यासाठी त्याला 15 मेपर्यंत कोठडीही सुनावण्यात आली होती.
सोशल मीडियावर त्याच्या सुटकेची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. भारतीय प्रसारमाध्यमांतूनही त्याच्या सुटकेची मागणी जोर धरत होती. तेव्हा अखेर त्याची ओळख पटल्यामुळे दोन दिवसांनंतर श्रीलंका सरकारने दानिशची सुटका केली आहे.
माझी सुटका झाली असून मी सुखरूप आहे, अशी माहिती दानिशनेही ट्विटरच्या माध्यमातून दिली. तो भारतात कधी परतणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.