मौलाना मसूद अझर ह्याला जागतिक आतन्कवादी म्हणून घोषित करून संयुक्त राष्ट्रसंघाने त्याच्या कुख्यातीवर जगाची राजमोहोर ठोकली आहे. एक मे ह्या दिवशी ही भारताला हवीहवीशी वाटणारी घटना घडली. एक मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने आलापिण्याचा हा दिवस. त्यावेळचा सत्तारूढ आतन्कवादी बहलोलखान हा तावडीत सापडला असताही त्याला जिवदान दिले म्हणून मराठ्यांचा सेनापती प्रतापराव गुजर ह्याला तोड दाखवू नकोस म्हणून महाराजांनी हाकलवून दिले त्याची आठवण येते. महाराजांचा शब्द म्हणजे मराठ्यांना परमेश्वराचा शब्द. उलट्या पावली प्रतापराव बहलोलखानावर चालून गेला आणि वीरगती पावला.
मौलाना मसूद अझर आपल्या कारावासात बंद असतांना विमान अपहरण प्रकरणी तडजोड म्हणून अठरा वर्षांपूर्वी त्याला मुक्त करावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यातच त्याने दिल्लीत भारताच्या संसद भवनात सभागृह चालू असतांना घुसून आतंकी आक्रमण केले होते. भारताचे रक्त सांडले होते. भारताच्या सार्वभौमत्वाला आणि राजकीय जीवनप्रणालीला ते भयंकर आव्हान होते. त्या मौलाना अझरला जागतिक आतन्कवादी म्हणून जगाकडून अधिकृतपणे निंदनीय ठरविण्यात भारताला यश आले आहे. आता त्याला पुन्हा एकदा प्रत्यक्ष अटक होईल आणि भारताची न्यायव्यवस्था त्याचा यथोचित समाचार घेईल तेव्हा राजधर्माचा शेवटचा उपचार पूर्ण होईल. तोपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार त्याची जेथे असेल तेथील चल आणि अचल संपदा जप्त करण्यात येईल. त्याच्यावर प्रवासबंदी असेल. त्याला शस्त्रपुरवठा करता येणार नाही. हा भारताचा फार मोठा कूटनीती विजय आहे. एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.म्हणून सांगितले पाहिजे की काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी जे भारतासाठी युद्ध पुकारून आहेत ते शोषित नाहीतच पण ज्यांना फाशी द्यावे असे नरभक्षक शोषक आहेत हे सिद्ध करण्यात भारताला यश आले आहे.
भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणात गेल्या पाच वर्षात काय बदल झाला असे विचारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी, ‘आता आम्ही जगातील कोणत्याही लहानमोठ्या राष्ट्रप्रमुखाशी डोळ्याला डोळा भिडवून न अडखळता बोलू शकतो’ असे उत्तर दिले होते. त्याची यथार्थता कळू लागली आहे. ह्याच मौलाना अझरने वर्ष 2008 मध्ये अजमल आणि इतर पाकिस्तानी कसाबाकरवी मुंबईच्या नागरी जीवनावर सशस्त्र आक्रमण करून पाकिस्तानी मनोवृत्ती भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी किती कपटी आणि क्रूर होऊ शकते ह्याचा दाखला दिला होता. त्यानंतर वर्ष 2009 पासून अमेरिका,ब्रिटन आणि फ्रान्स ह्यांनी चार वेळा ह्या मसूद अझरला जागतिक आतन्कवादी म्हणून सूचिबद्ध करावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीसमोर प्रस्ताव सादर केला. प्रत्येकवेळी चीनने मोडता घातला. भारताचा शत्रू तो आपला मित्र ह्या न्यायाने चीनने प्रत्येकवेळी पाकिस्तानची पाठराखण केली. परंतु मोदी सरकारने भारताची बाजू किती न्याय्य आणि समर्थनीय आहे हे वरील तीन राष्ट्रांना पटवून देण्यात थोडीही ढिलाई केली नाही. तरीही चीन बधत नाही असे पाहून अमेरिकेने चीनला जे काही व्हायचे ते राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतच होऊन जाईल अशी धमकी दिली. त्याचे दोन अर्थ होत होते. अमेरिका चीनला सहन होणार नाही इतकी आक्रमक होणार होती. चीनचा ढोंगीपणा जगाच्या वेशीवर टांगला जाणार होता. इस्लामी आतन्कवादाविषयीचे चीनचे अंतर्गत आणि बाहेरचे धोरण ह्यातील महदंतर उघडे करायचे ठरले होते. आपल्या देशात आतन्कवाद सोडाच पण इस्लामच्या प्रसाराविषयी चीन अत्यंत कठोर असतो आणि भारताला छळण्यासाठी पाकिस्तानच्या आतंकवादी कृत्यांना पाठिंबा देतो उघड होणार होते. त्यामुळे जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत भारताला काही अंशाने चीनच्या पुढे जाण्याची संधी मिळणार होती. तो धोका चीनने टाळला. अर्धं त्यजति पंडित: हा मार्ग स्वीकारला. हे मोदींच्या वास्तववादी आणि भारतहितकेंद्रित परराष्ट्र धोरणाने शक्य झाले. आतापर्यंतची आपली विदेश नीती पाकिस्तानकेंद्रित होती. अहिंसा आणि शांततामय सहजीवन अशा उदात्त विचारांची एकस्वता केवळ आपल्याकडे आहे ह्या गर्वाने भारताचे नेते हवेत तरंगत असत. जागतिक राजकारण उपयुक्ततावादावर चालते. लोकसंख्या, प्रचंड मोठी बाजारपेठ आणि प्राचीनत्वातून आलेली अनुभवसमृद्धता ही गुणवैशिष्ठये भारतापाशी आहेतच पण भारतात मानसिक क्रांती होत आहे हे मोदींनी बड्या राष्टांच्या दृष्टीस आणून दिले. पारतंत्र्याने जोपासलेली मानसिकता सोडून भारत एकात्म होत आहे आणि कुंठित राष्ट्रीय ऊर्जा संपूर्णपणे विकासकामाकडे एकवटणे शक्य होणार आहे हे मोदींनी लक्षात आणून दिले. लक्ष्य गाठण्याची क्षमता हे उपयुक्तवादाचे पहिले लक्षण असते. ते आपल्यात आहे हे मोदींनी पटविले. भारताच्या सामर्थ्याविषयी जगाला शंका होती ती मोदींनी दूर केली. राष्ट्रीय नेते आणि सर्वसामान्य समाज ह्यांच्यात उद्दिष्टांविषयी एकवाक्यता आहे हा साक्षात्कार गेल्या पाच वर्षात जगाला पहिल्यांदा होत होता आणि ती मोदींची सगळ्यात मोठी उपलब्धी होती. मोदींच्या ह्या पराक्रमात सुषमा स्वराज ,विजय गोखले , अजित दोवाल आणि कष्टाने मिळविलेल्या एकेक सहकार्याचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आता केवळ दखलपात्र राहिला नसून बड्या राष्टांच्या मांडीला मांडी लावून चीनशी बोलणी करू शकतो इतके स्थान भारताने मिळविले आहे. चीनकडून बासष्टच्या युद्धात झालेली मानहानी प्रथमच पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. मसूद अझर निमित्त आहे. आपण चीनला वळविले हे महत्वाचे आहे.
अर्थात युद्ध प्रदीर्घ काळ चालणार आहे आणि आता सुरवात झाली आहे. केवळ जागतिक आतन्कवादी हा शिक्का मारून सगळे साधले जाणार नाही. दाऊद इब्राहिम आणि बरेच आतन्कवादी ह्यापूर्वी घोषित झाले पण त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्याकरिता मनोवृत्तीवर आघात करावा लागेल. ते काम पुढील पाच वर्षात केले जाऊ शकते. ते समजण्यासाठी थोडे मागे जाऊ. मौलाना अझर ह्याचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते आणि आतन्कवादाला साह्य करीत होते. मसूद अझरला अकरा भावंडं आहेत. त्याने शालेय शिक्षण अर्धवट सोडून धर्मशिक्षण घेतले आणि तो अलीम म्हणजे मौलाना झाला. जिहाद करा आणि जगभर इस्लामचे राज्य स्थापा हे तो करीत असलेल्या उपदेशाचे सार आहे. कुराणानेच जिहाद करायला सांगितले आहे असे तो म्हणतो. रशिया-अफगाण युद्धात त्याने भाग घेतला आहे. ब्रिटनमध्ये त्याने मुक्काम करून जिहादचा प्रचार केला आहे. जिहाद ही मनोवृत्ती आहे . मुसलमानांना तिच्यापासून कसे दूर करता येईल ? हिंदूंना जिहाद म्हणजे काय हे कधी कळेल ? ह्या निवडणुकीतील एक उदाहरण घेऊ. एका प्रचारसभेत शत्रुघ्न सिन्हा ह्यांनी काँग्रेसच्या थोर नेत्यांची परंपरा सांगतांना महंमद अली जीनांचे नाव घेतले. लगेच भाजपने आरडाओरड केली. शत्रुघ्न म्हणाले की जीनांचे नाव चुकून तोंडात आले. मला मौलाना आझाद म्हणायचे होते. भाजपचे समाधान झाले. वास्तविक आझाद जिनांपेक्षा धोकादायक आहेत. जिना उघड शत्रू आहेत. आझाद काँग्रेसचे अध्यक्ष असतांना मुसलमान स्वतंत्र राष्ट्र असल्यासारखे आहेत असे म्हणाले आहेत. मुसलमानांनी भारतीयत्वात विलीन होण्याची मुळीच आवश्यकता नाही असे ते सारखे सांगत आहेत. आपण राज्यकर्ते आहोत ही भूमिका मुसलमानांनी कधीच सोडू नये ही आझादांची भूमिका आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुसलमानांच्या शब्दकोशात जिहाद हा शब्द आपण प्रथम आणला हा त्यांचा दावा आहे. बाबाराव सावरकर ह्यांनी आझादांविषयी लिहिले ते वाचून ज्यांना ठसका लागेल त्यांनी शेषराव मोरे ह्यांनी फाळणीवरच्या त्यांच्या पुस्तकात आझाद हे विश्व -इस्लामवादी कसे आहेत ह्याचे सविस्तर आणि सटीक वर्णन केले आहे. बाराशे वर्षाच्या मुसलमानांच्या परंपरेत त्यांनी सोडावे असे काहीही चुकीचे घडलेले नाही असे आझादांचे म्हणणे असेल तर काँग्रेसने हिंदी राष्ट्र कोणासाठी निर्माण केले आहे असा प्रश्न उपस्थित होतो. मुसलमानांच्या फुटीरतावादाचा प्रचार आझादांनी काँग्रेसचे अध्यक्ष असताना केला आहे. तरीही ते गांधी आणि नेहरू ह्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार होते. भारतातील मुसलमानांच्या आणि अनेक हिंदूंच्या मानसिकतेवर आझादांचा प्रभाव आहे. त्यातून भारत बाहेर पडला तर मौलाना मसूद अझरसारखे आतन्कवादी निर्माण होण्याची शक्यता तेव्हढी कमी होईल. ते काम पुढच्या पाच वर्षात करायचे कदाचित मोदींनी ठरविले असावे.
-अरविंद विठ्ठळ कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)