पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिवाळीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने नवीन पनवेल येथे श्री सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्या आली होती. या दुर्गदर्शन सोहळ्यात विविध उपक्रम प्रतिष्ठानकडून राबविण्यात आले. या सोहळ्याची रविवारी (दि. 30) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. पनवेल विभागाचे संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. किल्ला अभ्यास मोहिमेपासून ते किल्ला उभारणीपर्यंत पनवेल विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रेम, ओंकार, चैतन्य, पार्थ, श्रेयस, मंदार, अजय, प्रसाद, पायल, सूरज, संग्राम, शुभम, कल्पेश यांनी सतत 10 दिवस पावसाचे आव्हान स्वीकारत काम करून किल्ला प्रतिकृती पूर्ण केली. दगड माती विटा वापरून हा किल्ला बनविला. अभ्यास मोहिमेदरम्यान किल्ल्याचा इतिहास समजून फोटोग्राफी करण्यात आली त्यानंतर किल्ल्याची मोजणी करून गुगलच्या साहाय्याने मॅप तयार करण्यात आला. जमिनीवर स्केल टाकून नंतर बांधणीला सुरुवात केली. या प्रक्रियेदरम्यान मुलांना किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे महत्त्व समजावले जाते. याचबरोबर टीम बिल्डींग, टीम वर्क, कम्युनिकेशन स्किल, प्लॅनिंग या पद्धतीचे व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जातात या प्रतिकृतीच्या दुर्ग दर्शन सोहळ्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 23 ऑक्टोबरला झाले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंघाचालक प्रशांत कोळी तसेच राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले. धनंजय देसाई यांनी हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. राजे शिवराय प्रतिष्ठान शाखा पनवेलच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. दुर्गसंवर्धन करणार्या संस्थांचा धनंजय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे कार्यक्रम प्रमुख धनेश नीचीत हे होते. सूत्रसंचालन संकेत भोसले यांनी तर आभार केतन गुरव यांनी मानले. दरम्यान, 30 ऑक्टोबरपर्यंत ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती. 28 ऑक्टोबर रोजी स्त्रीशक्ती संघटन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत आई भवानीची ओटी भरणे तसेच हळदीकुंकू हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास स्थानिक मातृशक्तीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 30 ऑक्टोबर रोजी या दुर्गदर्शन सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव साजरा करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.