Breaking News

नेरळ-माथेरान घाटातील टेकडी वनव्याच्या भक्ष्यस्थानी ; 10 तास वन कर्मचारी जंगलात, अग्निशमन बंबाची मदत

कर्जत : बातमीदार

नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान 15 किलोमीटरचा परिसरातील जंगल जळून खाक झाले. नेरळ वनविभागाचे कर्मचारी हे शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यन्त जंगलात फिरून आग विझवत होते, तर कर्जतचे तहसीलदार हेदेखील मध्यरात्रीपर्यन्त घटनास्थळी उपस्थित होते.दरम्यान, जंगलातील हा वणवा विझविण्यासाठी कर्जत नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडून अग्नीशमन यंत्रणादेखील तात्काळ पाठविण्यात आली होती.

नेरळ येथून माथेरानकडे जाणार्‍या रस्त्यावर नांगरखिंड येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता वणवा लागला. तो एकाच ठिकाणी नाहीतर तब्बल तीन ठिकाणी लागल्याने, वणवा लागला नसून तो लावला गेला असेल, असा कयास लढवून वन विभागाची सर्व टीम घटनास्थळी पोहचली. सात वाजता वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी वणवा रोखण्यासाठी तीन टीम केल्या. वनपाल दत्तात्रय निर्गुडा, माधवी बढे आणि नारायण राठोड यांच्या तीन पथकांची  वणवा रोखण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यांच्या मदतीला वनरक्षक मोरे, पवार, वन मजूर एकनाथ माळी, काळूराम जामघरे, जानू शिंगाडे, ज्ञानेश्वर माळी, धोंडू बांगारे, तसेच त्या भागातील वन संरक्षण समितीचे अध्यक्ष धर्मा बांगारे आदी कर्मचारी यांनी सात वाजल्यापासून वणवा विझविण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळनंतर सुटलेल्या वार्‍याने आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. त्यामुळे आग विझविण्यात वन विभागाला रात्री अकरापर्यन्त यश आले नव्हते. त्यामुळे कर्जत येथून अग्निशमन यंत्रणा मागविण्यात आली, साडे अकरा वाजता अग्निशमन बंब आल्यानंतर आग नियंत्रणात आली. परंतु टेकडीच्या वरच्या भागात अग्निशमन यंत्रणा पोहचू शकत नसल्याने संपूर्ण आग विझविण्यात यश मिळत नव्हते. ही माहिती मिळताच कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास नेरळ -माथेरान घाटात येऊन लागलेल्या वनव्याची पाहणी केली. तीन ठिकाणी लागलेला हा वणवा तब्बल 10 तासांनी शांत झाला आणि सायंकाळी सात वाजता वणवा विझवायला आलेले वन कर्मचारी आणि अधिकारी हे पहाटे पाच वाजता घरी जाण्यास निघाले.

हे वणवे मानवनिर्मित असून ते लावणार्‍या व्यक्तींचा शोध शासकीय यंत्रणेने घेतला पाहिजे, त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी नेरळमधील तरुण कार्यकर्ते प्रमोद डबरे यांनी केली आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply