पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र या सरकारचे अस्तित्व दिसत नाही. हे सरकार कुचकामी आहे, अशी टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 15) केली. ते शेकाप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन चालणार्या शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराला तसेच शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेला कार्यकर्ते तसेच जनता त्रस्त झाली आहे. पर्यायाने शेकाप, शिवसेनेतील पदाधिकारी जुलमी राजकारणाला कंटाळून दुसर्या पक्षात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभासंघात समाविष्ट असलेल्या केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे, माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, विलास ठाकूर, महादेव म्हात्रे, राजेश घरत, संजय कोळी, मिलिंद कोळी, महेंद्र भोईर, प्रदीप भोईर, गणेश शेलार, रोशन भोईर, ग्रामपंचायत सदस्य वंदना वाघे, रविराज ठाकूर, अमर कर्णेकर, ऋषिकेश ठाकूर यांच्यासह शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्कृष्ट पर्याय असलेल्या असलेल्या भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशामध्ये युवकांची संख्या शेकडोहून अधिक होती. या पक्षप्रवेशामुळे उरण विधानसभा मतदारसंघात भाजप अधिक मजबूत झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या दावणीला बांधलेल्या शेकापचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
आपटा गावातील मैदानावर झालेल्या हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, युवा नेते विनोद साबळे, विद्याधर मोकल, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा पाटील, पं. स. सदस्य तनुजा टेंबे, विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, किरण माळी, प्रवीण खंडागळे, दिघाटी सरपंच अमित पाटील, माजी सरपंच विजय मुरकुटे, अनिल पाटील, मंगेश वाकडीकर, मुकुंद गावंड, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य योगेश्री मुरकुटे, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, विद्याधर जोशी, गणेश पाटील, सुनील माळी, फय्याज दाखवे, वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तांडेल, उद्योगपती बाळूशेठ पाटील,प्रतीक भोईर, सतीश ठाकूर, अतिश ठाकूर, पं. स. अध्यक्ष हिरामण ठाकूर, भाजप गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, युवा नेते रोशन पाटील, सुबोध ठाकूर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात विविध ठिकाणी भरीव विकास झाला, मात्र मागील दोन वर्षांच्या काळात काडीचाही विकास दिसत नाही. असे असताना ही मंडळी केंद्राकडे बोट दाखवतात. त्यांनी हे करण्यापेक्षा राजीनामे द्यावेत. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास राज्यात विकास होईल.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक अटकेत आहेत. आणखी काही नेते रडारवर आहेत. आघाडी सरकारमधील मंत्री तुरुंगात जात असताना राजकीय विरोधातून भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, परंतु न्यायालयाने निर्दोष भाजप नेत्यांना दिलासा दिला. त्यामुळे यांचा न्यायालयावर विश्वास नाही. काय म्हणायचे यांना. संपूर्ण राज्य सध्या अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी म्हटले.
शेकापचे अस्तित्व जवळपास रायगड जिल्ह्यातून संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. कधी काळी या शेकापचे रायगडात वर्चस्व होते. एक खासदार, तीन-चार आमदार, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, गावची सोसायटीसुद्धा शेकापची असायची, पण आज एकही आमदार नाही. कुठेही नामोनिशाण नाही. येत्या काळात शिवसेना, शेकापचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केला.
जनतेच्या मनात भाजपच्या माध्यमातून विश्वास निर्माण झाला आहे. याचे कारण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सक्षम नेतृत्व मिळाले. यापूर्वी देशाला पंतप्रधान होते, परंतु नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर देशाचे नाव जगाच्या पाठीवर मोठे करण्याचे काम केले. याआधी इतर देशांमध्ये आपल्या देशाला सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. आपल्याला परदेशी लोक खिजगणतीतही मोजत नव्हते, परंतु आता आपल्या देशाचे पंतप्रधान एखाद्या देशात जाणार असतात तेव्हा तिथले सरकार, लोक पायघड्या घालून त्यांच्या स्वागतासाठी हजर असतात. आपल्या देशाचा स्वाभिमान आणि प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक स्तरावर निर्माण केली, उंचावली. पंतप्रधान म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना त्यांनी विविध घटकांसाठी आणल्या, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत अवघ्या जगावर कोविडचे मोठे संकट आले. सगळे देश कोरोनावर कशी मात करायची यासाठी चाचपडत होते, परंतु संपूर्ण जगाला दिशादर्शन करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले, हे सांगायला निश्चितपणे अभिमान वाटतो. कोरोना काळात पीपीई कीट, मास्क, व्हेंटिलेटर जी जी सामग्री हवी होती ती आपल्या राज्याला केंद्राकडून मिळाली. त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री मात्र घरात बसून होते. केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सवर समोर येत होते. लस निर्माण करू, कोट्यवधींचे टेंडर काढू अशा घोषणा त्यांनी केल्या, मात्र प्रत्यक्षात केले काहीच नाही, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुचकामी असल्याचे अधोरेखित केले.
या वेळी बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, आपल्यातील अनेकांनी राजकारण वयाच्या अठरा वर्षापासूनच बघितले आहे. राजकारणाची आवड पिढ्यान्पिढ्या आपल्या सर्वांच्या नसानसात आहे, पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुम्ही भाजपात प्रवेश करून चांगला निर्णय घेतला आहे. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केले आहे. 2014 साली भाजपचे 283 खासदार निवडून आले. त्यांनतर 2019मध्ये 303 खासदार जिंकून आले ते फक्त कामाच्या जोरावर झाले आहे.
यापूर्वीच्या आमदारांनी या भागात लक्ष दिले नाही, पण आमदार महेश बालदी यांनी विशेष लक्ष देत विकासाचा झंझावात सुरूच ठेवला आहे. निवडणुकीच्या काळात जातीचे राजकारण करण्यात आले, परंतु आमदार महेश बालदी यांनी त्याची तमा न बाळगता आगरी, कोळी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय अशा सर्व बहुजन समाजासाठी काम केले. म्हणूनच ते जिंकून आले आणि सर्व समाजाचा विश्वास, पाठिंबा त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे. आमदार महेश बालदी यांच्या दूरदृष्टीतून यापुढेही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास होईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना आश्वासित केले.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आजचा हा पक्षप्रवेश सोहळा दृष्ट लागेल असा असून तुम्ही जगातील सर्वांत शक्तीशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षात प्रवेश केला आहे, तुम्ही विश्वासमान्य पक्षात प्रवेश केला. तुमच्यामुळे आमची शक्ती वाढणार आहे त्याबद्दल तुमचे स्वागत आणि आभार मानतो. परवा पनवेलमध्ये महाविकास विकास आघाडीने महागाईसंदर्भात मोर्चा काढला, पण त्यात विषययाला बगल देत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याच नावाचा गजर केला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव वाढले. त्यामुळे पेट्रोल महाग झाले आणि त्याचे खापर केंद्रावर फोडण्याचे प्रयत्न केले जातात. मग एक लिटरमागे 51 रुपये राज्य सरकारकडे जाते त्याबद्दल महाविकास आघाडी का गप्प आहे, असा सवाल महेश बालदी यांनी उपस्थित केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कुटुंबाची जागा सिडकोने संपादित केली आणि त्या बदल्यात त्यांना सिडकोने प्लॉट दिले आणि तो प्लॉट राज्य सरकारने राजकारण करीत रद्द करण्यात आला. तो प्लॉट एखाद्या जमिनीच्या मोबदल्यात मिळाला असेल, तर तो भ्रष्टाचार होऊच शकत नाही, मात्र त्याला भ्रष्टाचाराचे रूप ठाकरे सरकारने दिले आणि ठाकरे सरकारचा हा राजकारणी डाव सर्वश्रुत उघड झाला आहे. मुद्दामहून त्रास देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, जागेसंदर्भात आमच्यावर एफआयआर झाली सांगतात. आमच्यावर एफआयआर झाली नाही, पण तुम्ही टायर आणि स्टेपन्या चोरून शेवाला जगत होतात ना तेव्हा जेलमध्ये जेवणाचे डब्बे महेश बालदीने दिले आहेत हे लक्षात ठेवा. हे सांगायची वेळ का येते कारण हे एक काढाल, तर मी तुमचे 10 काढीन. माझा इतिहास काळा नाही तुमचा इतिहास काळा आहे. ते स्वतः एकटे कधीच निवडून येऊ शकत नाही, कारण पोलीसशिवाय ते एकटे फिरत नाहीत. लग्नात धक्का मारून यांना लोकं जातात. एकटे उरणच्या बाजारात फिरू शकत नाही. त्यांना वाटते शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसला सोबत घेऊ आणि जमलं तर बघू अशी स्थिती त्यांची झाली आहे, पण ज्ञानेश्वरभाई तुमच्यासारखा नेता भाजपसोबत आल्याने त्यांनी आज एक जास्त पेग लगावला असेल, अशी खोचक टीकाही त्यांनी लगावली. त्यांचे हृदय आणि लोकांसाठी पैसे खर्च करण्याची ताकद नाही हे मला माहीत आहे, असे सांगतानाच मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना आणले तरीही हरले. आता सोनिया गांधींना प्रचाराला आणा तेव्हा 10 मते वाढली तर वाढली, अशा शब्दांत मनोहर भोईर यांना त्यांनी फटकारले. मेट्रोमध्ये कुठलेही योगदान नसताना त्याचे जसे उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केले तसे जे काम केले नाही त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार मनोहर भोईर करीत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. असे उद्योग करण्यापेक्षा विकासाचे बोला, असे आव्हानही त्यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी-ना. नितीन गडकरींचे कौतुक करू तेवढे कमी -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, देशात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भूतो न भविष्यतो विकासकामे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या माध्यमातून होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतीने विकासपुरुष म्हटले जाते. त्यांचे आडनाव गडकरी असले तरी देशातील लोकं आणि विविध पक्षातील खासदार त्यांना रोडकरी म्हणून संबोधतात इतके रस्ते त्यांच्या माध्यमातून देशात तयार झाले आहेत. नुकताच पनवेलमध्ये 3500 कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. ते इथवर थांबले नाहीत 1200 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले आणि तीन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची घोषणाही त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे गोडवे पनवेल, उरण, खालापूरकर एक-दोन वर्षे नाही, तर 10-20 वर्षे गात राहतील. गडकरीसाहेबांचे कौतुक करू तेवढे कमी आहेत आणि आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले आहे.
मनोहर भोईर तुमची कुलस्वामिनी आठवा आणि मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा -आमदार महेश बालदी
पनवेलमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. ते सर्वांची मोट बांधून जमेल का हे पाहत आहेत. मोर्चात मनोहर भोईरांनी भाषण केले आणि त्यात काय सांगितले, भिवंडीवाला ट्रस्ट जमीन घेतली, हो मी घेतली आणि ती रितसर पैसे देऊन घेतली आहे. तसे निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद आहे. मनोहर भोईर तुमची कुलस्वामिनी आठवा, मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा, महेश बालदीकडे त्या जागेमध्ये मला पाच टक्के तरी पार्टनर घ्या आणि प्लॉट मोकळे करा, असे सांगायला आले होते की नाही हे जाहीर करा, असे खुले आव्हान या वेळी आमदार महेश बालदी यांनी दिले.
याआधी शेकापमध्ये असताना आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जात होतो. त्यात आमची दमछाक होत होती. अखेर आम्ही ठरवले की प्रवाहाबरोबर जाऊ. त्यामुळे दमछाक होणार नाही आणि इच्छित स्थळीही लवकर पोहचू.
-ज्ञानेश्वर घरत, जि. प. सदस्य
येत्या काळात आपटा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल हे माझे विरोधकांना खुले आव्हान आहे. त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही आम्ही भाजप उमेदवाराला येथून मोठे मताधिक्क्य देऊ.
-दत्ता पाटील, माजी सरपंच