कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील नांगुर्ले गावात उभारलेल्या दुमजली मंदिरामध्ये जय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने चार दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने नांगुर्ले गावात चार वर्षांपासून मंदिर उभारणीचे काम करण्यात येत होते. सुमारे तीस लाख रुपये खर्च करून हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात श्री मारुतीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मूर्तीची दिंडीसाहित नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. त्यांनतर मूर्तीला जलधिवास व धान्यवास करण्यात आला. दुसर्या दिवशी पुरोहित शरद अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यांनी अजय पवार व लक्ष्मण कदम या ग्रामस्थांच्या हस्ते सपत्नीक विधिवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला. त्यांनतर आळंदी येथील हभप लक्ष्मण महाराज पाटील यांचे किर्तनाने समारंभाची सांगता झाली.
यावेळी गजानन धामणसे, कैलास म्हामले, संजय मोरे, योगेश कदम, वसंत हुमणे, सुनील मोरे, सुभाष कदम, नथुराम लाड, सुर्यकांत देशमुख, झुलकरनैन डाभिया, हुसेनी भानपुरवाला, अजीज भानपुरवाला आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.