Breaking News

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि. 16) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार भरत गोगावले, समितीचे अध्यक्ष रघुजी आंग्रे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजदरबारस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान, आणि वीरता असलेला हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम दूरदृष्टी पहिली. नौसेना उभी करून समुद्र तटाचेदेखील रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. शिवरायांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेत स्वराज्य निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल.
ना. ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणून संबोधले होते, तर बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज यांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला चालना दिली होती.
औरंगजेबानेदेखील शिवरायांची स्तुती केली होती. यामुळे आजच्या राजकारणात महाराजांची विचारधारा अवलंबून काम केले पाहिजे. शिवरायांची युद्धनीती आणि गोरीवाल या तंत्राचा वापर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइकमध्ये केल्याचा उल्लेख व अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना या वेळी देण्यात आला, तर सैन्यदल अधिकारी व्हाईस अ‍ॅडमीरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. सुभेदार तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांचादेखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply