पुणे ः प्रतिनिधी
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन लोकांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 90 लाख जप्त केल्याची माहिती त्यांनी शुक्रवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात चार साडेचार कोटींपर्यंत गैरव्यवहार झाल्याचे समजते. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे. टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांकडून 35 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 88 लाख रुपये रोख आणि सोने जप्त करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा झाली होती. चार ते पाच जणांची लिंक लागली असून प्राथमिक तपासातून या गोष्टी समोर आल्या असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. दोन पेपरफुटी प्रकरणांचा तपास करताना म्हाडा पेपरफुटीची लिंक सापडली. त्यातूनही काही लोकांना अटक केली. त्यात टीईटीच्या परीक्षेत घोटाळा असल्याचे समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली होती.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …