महासभेत निर्णय; तळोजा दफनभूमीही होणार विकसित
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यास मंगळवारी (दि. 19) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन दल आता अत्याधुनिक होणार आहे. त्याचप्रमाणे तळोजा सेक्टर 15मधील मुस्लिम दफनभूमी विकसित करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या तीन कर्मचार्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे धनादेश या वेळी देण्यात आले.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर उपस्थित होते.
पनवेल महापालिका अग्निशमन विभागासाठी 15 कोटी 85 लाख रुपयांची नवीन अग्निशमन वाहने खरेदी करण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये अॅडव्हान्स फायर इंजिन, रॅपिड इंटरवेन्शन व्हेइकल, मल्टिपर्पज टर्न टेबल लॅडर, वॉटर बाउजर 18 कोलो लिटर व अॅडव्हान्स रेस्क्यू टेंडरचा समावेश आहे. या विषयावर चर्चा करताना अग्निशामक दलातील जवानांना आग प्रतिरोधक गणवेश व हॅण्ड ग्लोव्हज पुरवण्याची मागणी सदस्यांनी केली.
नितीन पाटील यांनी कळंबोली सर्कलजवळ तयार होत असलेल्या नवीन पुलाजवळ अग्निशमन केंद्र उभारण्याची उपसूचना केली. सिडकोच्या अग्निशामक दलाकडे आहेत तशा बाईक घेण्याचीही सूचना करण्यात आली. या वेळी आयुक्तांनी तीन लाख लोकसंख्येला सहा गाड्या व नंतरच्या पुढील एका लाख लोकसंख्येला एक गाडी असे प्लॅनिंग असल्याचे सांगून सिडकोने पनवेल, कामोठे, कळंबोली, रोहिंजण, धानसर, एमआयडीसीसह 29 गावांच्या प्रत्येक शहराला अग्निशामक केंद्र प्रस्तावित केली असल्याची माहिती दिली. उपसूचनेसह या विषयाला मंजुरी देण्यात आली.
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ’अ’मधील तळोजा सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक 8 व 9मध्ये मुस्लिम समाजासाठी दफनभूमी विकसित करण्यात येणार आहे.
यासाठी दोन कोटी 41 लाख 63 हजार रुपयांच्या कामाला महासभेत मंजुरी देण्यात आली. कळंबोलीतील ख्रिश्चन दफनभूमीही विकसित करण्यात यावी तसेच महापालिका हद्दीतील हिंदू स्मशानभूमी विकासाची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी सूचविले. याबाबत महापौरांनी प्रशासनाला पुढच्या सभेत त्याची माहिती देण्यास सांगितले.
पूर्वाश्रमीच्या नगर परिषदेमार्फत सहा वाणिज्य संकुलातील 30 वर्षांच्या कालावधीकरिता भाडे तत्त्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा व हस्तांतर करण्यास मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव या वेळी मांडण्यात आला, पण नगरसेवकांना त्याची पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे तो विषय स्थगित ठेवण्यात आला.
पनवेल शहरातील कृष्णाळे तलावाच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये झोपणार्या गजरेवाल्यांचा विषय नगरसेविका रूचिता लोंढे यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी काढला. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी उत्तर देताना सांगितले.
महासभेत झालेल्या चर्चेमध्ये नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, हरेश केणी, बबन मुकादम, नगरसेविका रूचिता लोंढे आदींनी सहभाग घेतला.
मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसांना धनादेश सुपूर्द
कोरोना काळात पनवेल महापालिकेचे सफाई कामगार लक्ष्मी गायकवाड व गणपत पाटील तसेच लिपिक राजेश बागडे यांचे निधन झाले. या कोरोना योद्ध्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून मिळालेले 50 लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या वारसांना या सभेत देण्यात आले.