‘अंगारक’निमित्त महड, पालीमध्ये दर्शनासाठी रांगा
खोपोली, पाली : प्रतिनिधी
अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग साधून भाविकांनी मंगळवारी (दि. 19) अष्टविनायकांपैकी तीर्थक्षेत्र असलेल्या रायगडातील महाड आणि पाली येथे गणरायाचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील इतर गणेश मंदिरेही भाविकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे धार्मिक स्थळे व मंदिरेही दर्शनासाठी खुली झालेली आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी तीर्थक्षेत्र असलेल्या महडमध्ये वरदविनायकाचे आणि पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने गणेशभक्तांच्या मंदिरांत पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कोरोना काळात व्यवसायाला खीळ बसलेल्या दुकानदार, विक्रेते यांनाही दिलासा मिळाला. दोन्ही ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने निवास, पाणी व अन्य व्यवस्था करण्यात आली होती, तर मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता.