माणगाव ः प्रतिनिधी
औषधालय, दूध, किराणा माल, बेकरी, भाजीपाला, फळे,दवाखाने, वृत्तपत्रे आदी अत्यावश्यक सेवा वगळता माणगाव नगरपंचायत हद्दीतील इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश माणगाव नगरपंचायतीने शुक्रवारी (दि. 20) दिल्यावर त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 21)पासून करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्यातच रविवारी (दि. 22) केंद्र सरकारने जनता कर्फ्यू आदेश जाहीर केल्याने माणगावनगरीतील कोणाही व्यक्तीने दिवसभर घराबाहेर पडू नये, अशा केंद्र सरकारतर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे नगरपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांनी पालन करावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेट यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, स्वच्छता व आरोग्य सभापती रत्नाकर उभारे, सर्व नगरसेवक-नगरसेविका व मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या साथीच्या रोगाने जगभर थैमान घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने माणगाव नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नगरीतील बीअर बार, परमिट रूम, कापड दुकाने,पानटपरी, सोन्या-चांदीची दुकाने, मटण, चिकन यांची दुकाने, भांड्याची दुकाने, हॉटेल्स, गॅरेज, चपलांची दुकाने त्याचप्रमाणे अन्य अत्यावश्यक नसलेली दुकाने बंद ठेवावी, अशी सूचना मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केली आहे. जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करेल त्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असेही नगरपंचायततर्फे सांगण्यात आले आहे.