मागण्या मान्य न झाल्यास 2 मेपासून काम बंद आंदोलन
उरण : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 2 मेपासून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. या लढ्यासाठी सज्ज रहा, असे महाराष्ट्र राज्य नगरपंचायत, नगर परिषद व संवर्ग कर्मचारी समितीचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपंचायत, नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. डी. एल. कराड, रामगोपाल मिश्रा, डी. पी. शिंदे, अॅड. सुरेश ठाकूर आणि अॅड. सुनील वाळूंजकर यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीचे राज्याचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी बुधवारी (दि. 20) नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची मंत्रालयात भेट घेऊन सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील कामगार कर्मचारी यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी निवेदन सादर केले.
संघर्ष समितीने केलेल्या मागण्या मान्य करून सन्मानपूर्वक योग्य तोडगा निघण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे; अन्यथा कोणत्याही परिस्थितीत 2 मेपासून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले. त्यावर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी लवकरात लवकर आपल्या मागण्यांबाबत बैठक आयोजन करण्यात येईल असे आश्वासन देऊन ज्या दिवशी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय (वरळी) यांनी आपल्या संघर्ष समितीस चर्चेसाठी 22 एप्रिल रोजी बोलावण्यात आले आहे त्याच दिवशी मंत्रालयीन स्तरावरही आपली बैठक घेण्याबाबत आश्वास्त केले.
मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत 2 मेपासूनचे बेमुदत काम बंद आंदोलन होणारच आहे. त्यामुळे संघटनेचे निमंत्रक व मुख्य संघटक जोपर्यंत कोणताही निर्णय अधिकृतरित्या आपणास कळवत नाहीत तोपर्यंत आंदोलनाची तयारी युद्ध पातळीवर चालूच ठेवणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.संघर्ष समितीचे सर्व कामगार नेते, अध्यक्ष व पदाधिकार्यांनी आंदोलनाची तयारी जोरात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.