उरण : प्रतिनिधी
जेएनपीटी विभागात सिडको हद्दीत असणार्या नवघर गावाला गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेची तहान भागली जात नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यायाने नवघर गावाला जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवघर ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवळजवळ चार ते पाच हजारांच्या आसपास आहे. द्रोणागिरी नोडच्या मध्यवर्ती ठिकाणी नवघर गाव येत असून सिडकोच्या विकासामध्ये नवघर गावाचे मोलाचे योगदान आहे. 1984पासून नवघर गावाचे सिडकोसाठी योगदान आहे. एवढे योगदान असूनही याच भूमिपुत्रांस पाणी मिळत नाही ही खेदाची बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी नवघर गावाला मुबलक पाणीपुरवठा केला जात होता, मात्र आता सिडकोच्या काही अधिकार्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने नवघर गावातील जनतेची तहान भागत नाही. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
जनता त्रस्त
नवघर गावातील जनता पाणीटंचाईमुळे त्रस्त आहे. येथे गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने पाण्याची टाकी अर्धीच राहते. त्यामुळे जनतेला व्यवस्थित पाणीपुरवठा करता येत नाही. यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जलवाहिनी फुटल्याने चार-पाच दिवस पाणीपुरवठा कमी होता, मात्र तीन महिन्यांपासून ही समस्या असेल तर तेथील अभियंत्यांशी बोलून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-चिमाजी दलाल, कार्यकारी अभियंता, हेटवणे पाणीपुरवठा