पनवेल ः वार्ताहर
नवीन पनवेल सेक्टर 13 येथे राहणारे आणि मानखुर्द पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले संतोष अंबाजी भगत यांनी 23 मार्च रोजी ताप आल्याने व कोरोनासंबंधीची लक्षणे दिसू लागल्यामुळे तातडीने खारघरमधील ग्रामविकास भवनात वैद्यकीय तपासणी करून घेतली. तेथे कॉन्स्टेबल संतोष भगत यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पनवेल महापालिकेच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी कोरोनाशी निकराने लढाई करत त्यांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आणि पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
या कठीण काळात त्यांना त्यांच्या खात्यातील वरिष्ठ, सहकारी आणि मित्रपरिवाराकडून आपुलकीची वागणूक मिळाल्याचे ते नम्रपणे कबूल करतात. परमेश्वराची कृपा आणि वरिष्ठांच्या व मित्रपरिवाराच्या आशीर्वादामुळे आपण कोरोनावर मात करू शकलो. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, मात्र कोरानापासून वाचण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन कॉन्स्टेबल संतोष भगत यांनी केले आहे. दरम्यान, आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे संतोष भगत यांना कोरोना झाल्यानंतर त्यांची पत्नी व मुलीलाही कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारानंतर त्यांच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या असून, त्यांनाही येत्या एक-दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे. एकूणच कॉन्स्टेबल संतोष भगत खंबीर मानसिकतेमुळे कोरोनावर विजय प्राप्त करू शकले आहेत.