कर्जत : बातमीदार
माथेरानच्या दस्तुरी नाका येथे पर्यटकांच्या वाहनांसाठी एमएमआरडीएने सुसज्ज वाहनतळ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला अंतिम स्वरूप येत असले तरी तेथे उभारण्यात येत असलेली गटारे आणि लावलेले पेव्हर ब्लॉक यांचा दर्जा नित्कृष्ट असून, वाहनतळाच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे सर्व वाहने दस्तुरी नाका येथे पार्किंग करून पुढे माथेरानला जावे लागते. पर्यटक माथेरानला येताना कधी स्वतःची, तर कधी प्रवासी वाहनाने घेऊन येत असतात. दिवाळी, नाताळ, नववर्ष स्वागत आणि एप्रिल-मे महिना या काळात माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी असते. त्या काळात माथेरानच्या दस्तुरी नाका येथील वाहनतळामध्ये वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नसते. जागा उपलब्ध नसेल, तर पोलिसांकडून पर्यटकांना नेरळ-माथेरान घाटरस्त्यात जुम्मापट्टी येथे वाहने पार्क करायला सांगितले जाते. त्याचप्रमाणे वाहनतळावर आपली महागडी गाडी लावता येणार नाही याची कल्पना आल्यास पर्यटक अन्य पर्यटनस्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. लहान असलेल्या दस्तुरी नाका येथील वाहनतळामुळे माथेरानचा पर्यटन व्यवसायदेखील धोक्यात येतो.
नेहमीची ही समस्या लक्षात घेऊन माथेरान गिरीस्थान नगर परिषद गेली अनेक वर्षे दस्तुरी नाका येथील वाहनतळ सुसज्ज बनविण्यासाठी वनविभागाकडे जागेची मागणी करीत होती. त्याचवेळी माथेरान सनियंत्रण समितीदेखील वाहनतळाबाबत आग्रही असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण दस्तुरी नाका येथील वाहनतळ अद्ययावत करण्यासाठी निधी देण्यास तयार झाला आहे. एमएमआरडीएच्या निधीतून माथेरानमधील दस्तुरी नाका येथील वाहनतळ नव्याने विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. त्या निधीमधून वन विभागाने अधिकची जागा दिली आहे. या जागेच्या सभोवताली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आरसीसी काँक्रीटचे गटार बांधण्यात आले आहे. तेेथे मोठ्या प्रमाणात झाडे असून, त्या झाडांना कोणताही धोका न पोहोचवता आरसीसी काँक्रीटकरण करण्यात येत असून, त्यावर पेव्हर ब्लॉक लावले जातात आहेत, मात्र गटारे आणि पेव्हर ब्लॉकचा दर्जा नित्कृष्ट असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.