Breaking News

केमस्पेक कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ

जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा पुढाकार

पनवेल ः प्रतिनिधी
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कायमस्वरूपी कामगारांना आता अच्छे दिन आले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून येथील कायमस्वरूपी कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करार शनिवारी (दि. 20) येथे संपन्न झाला.  
तीन वर्षांसाठी झालेल्या या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षी 9250, तर दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी प्रत्येकी 1625 रुपयांची अशी एकूण दरमहा 12 हजार 500 रुपयांची पगारवाढ तसेच मेडिकल पॉलिसी, 20 टक्के बोनस, 50 हजार रुपये बिनव्याजी कर्ज आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या करारनाम्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, केमस्पेकचे व्यवस्थापक राजेंदर हारकरा, अनुराग तिवारी, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवींद्र नाईक, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, राजेंद्र कारेकर, रामदास गोंधळी, कामगार प्रतिनिधी संतोष घरत, अंकुश भोईर, आतिष भगत, जीवन भोईर, रूपेश ठाकूर, बळीराम भोईर आदी उपस्थित होते.

कामगार जगला तरच कारखाने जगतात. त्यामुळे कामगारांना त्यांचे न्यायिक हक्क मिळालेच पाहिजेत. त्याचबरोबर कारखान्यांची प्रगतीही झाली पाहिजे, अशी आमची कायमच आग्रही भूमिका असते. त्यामुळे आम्ही कामगारांच्या हक्कांसाठी सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. कंपनी आणि कामगारांनी सर्वांगीण प्रगतीसाठी हातात हात घालून काम करणे क्रमप्राप्त आहे. कामगार कंपनीच्या नफ्यात भर पाडण्यासाठी सहकार्य करीत आले आहेत आणि यापुढेही करतील.
-प्रशांत ठाकूर, आमदार

कामगार व कंपन्यांचे विकासासाठी अतूट नाते राहावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना प्रयत्नशील आहे. सदैव कामगारांच्या उन्नतीसाठी काम करीत आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोविडच्या कठीण परिस्थितीत आपल्या युनिटच्या कामगारांनी कंपनी सुरू ठेवत उत्पादन वाढविण्याचे काम केले. त्यामुळे या युनिटच्या कामगारांचा अभिमान वाटतो.                                
-जितेंद्र घरत, कामगार नेते

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply